For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘पावसाळी कोकणा’वर दुष्काळाचे संकट

06:10 AM Sep 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘पावसाळी कोकणा’वर दुष्काळाचे संकट
Advertisement

ज्या कोकणाची ओळखच मुसळधार पाऊस, खळाळते ओढे-नाले आणि वर्षभर पाण्याने समृद्ध प्रदेश अशी आहे, त्याच कोकणाला यंदा उन्हाळ्यात पाण्यासाठी टँकरकडे पाहावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांमध्ये पावसाच्या लहरीपणामुळे जलसाठ्यांवर परिणाम झाला असून भातशेतीवरही संकटाचे ढग दाटले आहेत. पावसाची तूट, पावसातील प्रदीर्घ खंड, जमिनीतील कमी झालेला ओलावा आणि अपुरे जलसाठे यांचा एकत्रित परिणाम आगामी उन्हाळ्यात जाणवू शकतो. त्यामुळे ‘पाणीटंचाई सुरू झाल्यावर उपाय’ या पारंपरिक पद्धतीऐवजी ‘टंचाई येण्यापूर्वीच नियोजन’ करण्याची वेळ कोकणावर आली आहे.

Advertisement

को कण म्हटले, की डोळ्यांसमोर उभे राहते ते हिरवेगार डोंगर, दऱ्याखोऱ्यांतून वाहणारे झरे, खळाळणारे ओढे, भाताची हिरवीगार शेती आणि पावसाच्या सरींनी न्हाऊन निघालेली गावे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्जन्यमानाच्या प्रदेशांपैकी आहेत. त्यामुळे येथे पाण्याची कमतरता भासणे हे अनेकांना अनपेक्षित वाटू शकते. मात्र, मुबलक पाऊस पडणे आणि वर्षभर पुरेल एवढे पाणी उपलब्ध असणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पावसाच्या हंगामात अनेक टप्प्यांवर पावसाने मोठे खंड घेतले. सिंधुदुर्गात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय पर्जन्यमानाची तूट नोंदली गेली आहे. त्यामुळे राज्य सरकारने दुष्काळी जिल्हा जाहीर केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील 3 तालुके दुष्काळी तालुके म्हणून जाहीर केले आहेत. त्यामुळे कोकणात यावर्षी उन्हाळ्यात  पाण्याची किंमत मोजावी लागणार आहे हे आतापासूनच स्पष्ट झालेले आहे.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील अनेक भागात पावसाचे प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी राहण्याबरोबरच पावसाचे वितरणही विस्कळीत झाले. त्यामुळे जमिनीतील ओलावा टिकून राहण्यावर परिणाम झाला आहे. ओढे-नाले, विहिरी आणि लहान जलसाठ्यांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. आज पाणी उपलब्ध असले, तरी उन्हाळ्यात त्याची उपलब्धता किती राहणार, हा खरा प्रश्न आहे. पावसाळा संपताना धरणे, तलाव, बंधारे आणि अन्य जलसाठ्यांमध्ये किती पाणी आहे, यावर पुढील उन्हाळ्याचे चित्र मोठ्या प्रमाणात अवलंबून असते. यंदा अपेक्षित पर्जन्यमान न झाल्याने काही जलसाठे पूर्ण क्षमतेने भरलेले नाहीत. परिणामी मार्च-एप्रिलनंतर पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषत: डोंगराळ आणि दुर्गम भागातील लहान गावांना याचा फटका प्रथम बसू शकतो. ज्या गावांमध्ये उन्हाळ्यात विहिरींची पाणीपातळी झपाट्याने खाली जाते, तेथे यंदा परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.

Advertisement

त्यामुळे ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा प्रशासनाने आतापासूनच गावनिहाय जलस्त्राsतांचा आढावा घेणे आवश्यक आहे. कोणत्या गावाला कोणत्या महिन्यात पाणीटंचाई जाणवू शकते, कोणते स्त्राsत टिकाऊ आहेत, कुठे पर्यायी स्त्राsत उपलब्ध आहेत आणि कुठे टँकरची आवश्यकता भासू शकते, याचा आराखडा तयार करणे गरजेचे आहे. पाण्याच्या प्रश्नाबरोबरच कोकणातील भातशेतीसमोरही गंभीर आव्हान उभे राहिले आहे. भात हे रत्नागिरी-सिंधुदुर्गातील प्रमुख खरीप पीक. पावसाच्या अनियमिततेचा आणि पावसातील खंडाचा थेट परिणाम भाताच्या वाढीवर झाला आहे. पावसानंतर आलेले कडक ऊन, जमिनीतील ओलावा कमी होणे आणि काही भागांत रोग-कीडींचा प्रादुर्भाव यामुळे भातपिकाची चिंता वाढली आहे. पिके करपणे, पाने पिवळी पडणे आणि रोगांचा फैलाव यामुळे उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम केवळ शेतकऱ्याच्या उत्पन्नावर होणार नाही तर, भातशेतीवर अवलंबून असलेली ग्रामीण मजुरी, धान्य व्यापार, वाहतूक आणि स्थानिक बाजारपेठेवरही त्याचे परिणाम होणार आहेत. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांमध्ये पीक नुकसानीचे वस्तुनिष्ठ सर्वेक्षण करून प्रत्यक्ष नुकसानीनुसार मदतीचे नियोजन करणे आवश्यक आहे.

कोकणात पाऊस पडतो म्हणून पाण्याचे नियोजन करण्याची गरज नाही, ही मानसिकता बदलावी लागेल. उलट मोठ्या प्रमाणात पाऊस पडणाऱ्या प्रदेशात पावसाचे पाणी साठवून ते उन्हाळ्यापर्यंत टिकविणे अधिक महत्त्वाचे आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांसाठी गावनिहाय ‘वॉटर बजेट’ तयार करण्याची गरज आहे. उपलब्ध जलसाठा किती, पिण्यासाठी किती पाणी लागणार, शेतीसाठी किती गरज आहे आणि उन्हाळ्यात कोणते स्त्राsत किती काळ टिकतील, याचे गणित आत्ताच मांडले पाहिजे. जलसंधारणाची अपूर्ण कामे पूर्ण करणे, पारंपरिक विहिरी आणि तलावांचे पुनऊज्जीवन, लघुबंधारे, गाळ काढणे, भूजल पुनर्भरण आणि पाणी गळती रोखणे यावर भर द्यावा लागेल. पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर टँकर सुरू करणे ही प्रशासनाची तातडीची गरज असू शकते; मात्र दीर्घकालीन जलव्यवस्थापनाचा तो पर्याय नाही. टँकरची वेळ येण्यापूर्वी गावातील उपलब्ध जलस्त्राsत सक्षम करणे, पाण्याचा काटकसरीने वापर करणे आणि संभाव्य टंचाईग्रस्त गावांची यादी तयार ठेवणे आवश्यक आहे. पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देत, शेती आणि अन्य वापरासाठी उपलब्ध पाण्याचे नियोजन करावे लागेल.रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील यंदाची परिस्थिती केवळ एका हंगामाचे संकट म्हणून पाहणे योग्य ठरणार नाही. हवामानातील बदल, पावसाच्या वितरणातील अनिश्चितता आणि वाढती पाण्याची गरज यामुळे भविष्यात अशा परिस्थितीची पुनरावृत्ती होऊ शकते. म्हणूनच यंदाच्या पावसातील तूट ही कोकणासाठी धोक्याची घंटा मानून जलव्यवस्थापनाचा दीर्घकालीन आराखडा तयार करणे गरजेचे आहे. दुष्काळाचे संकट दूर करण्यासाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी कच्चे बंधारे बांधून पाणी अडवणार असल्याचे जाहीर केलेय. कच्चे बंधारे बांधण्यासाठी धडक मोहीम आतापासूनच राबविणे आवश्यक आहे.

संदीप गावडे

Advertisement
Tags :

.