For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतासह जगभरात दुष्काळाची छाया

07:00 AM Jun 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारतासह जगभरात दुष्काळाची छाया
Advertisement

जागतिक हवामान संघटनेच्या इशाऱ्यानंतर केंद्र सरकारकडून निर्देश : राज्यांना कृती योजना लागू करण्याच्या सूचना

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

यंदा भारतासह जगभरात दुष्काळाची शक्यता आहे. यासंबंधी भारतीय हवामान विभागापाठोपाठ आता जागतिक हवामान संघटनेने (डब्ल्यूएमओ) मंगळवारी रात्री उशिरा जागतिक हवामान इशारा जारी केला आहे. या संयुक्त राष्ट्रांच्या हवामान संस्थेनुसार, पॅसिफिक महासागरातील समुद्राचे पाणी वेगाने गरम होत असल्यामुळे जून ते ऑगस्ट दरम्यान एल निनो विकसित होण्याची 80 टक्के शक्यता आहे. ही घटना नोव्हेंबरपर्यंत टिकण्याची शक्यता 90 टक्के किंवा त्याहून अधिक आहे.

Advertisement

जागतिक हवामान संघटनेच्या मते, एल निनो आणखी तीव्र झाल्यामुळे भारतासह जगभरात दुष्काळ, पूर, सागरी आणि भू-उष्णतेच्या लाटा आणि धोकादायक हवामान घटना घडू शकतात. याचदरम्यान, कृषी मंत्रालयाने राज्यांना आणि संबंधित संस्थांना सामान्यपेक्षा कमी मान्सून आणि एल निनोच्या शक्यतेला प्रतिसाद म्हणून जिल्हास्तरीय योजना लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शेतकऱ्यांपर्यंत माहिती जलदगतीने पोहोचवण्यासाठी डिजिटल आणि कॉल सेंटर सेवा मजबूत करण्याचे आवाहनही केले आहे.

या धोक्याच्या इशाऱ्यानंतरही इंडियन ओशन डायपोल आणि मॅडन-जुलियन ऑसिलेशन या भारतातील दोन सक्रिय प्रणालींमुळे मान्सूनची स्थिती समाधानकारक राहूही शकते. ही ढग आणि वाऱ्यांची एक जागतिक प्रणाली असून विषुववृत्तावर फिरते. अशी स्थिती भारतीय प्रदेशातून जात असताना ती कमी पावसाच्या काळातही मुसळधार पावसाच्या सरी आणू शकते. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मान्सूनच्या हंगामात देशात सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. नैऋत्य मान्सून सध्या उशिरा येत आहे. तो 4 जून रोजी केरळममध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. दरवर्षी मान्सून साधारणपणे 1 जूनच्या आसपास केरळममध्ये येतो.

प्रभावित देशांना सज्जतेचे आवाहन

हवामान संस्थेने तीव्र दुष्काळाची भीती व्यक्त केली आहे. त्यांनी भारतासह सर्व प्रभावित देशांच्या सरकारांना, कृषी, आरोग्य आणि ऊर्जा विभागांना युद्धपातळीवर तयार राहण्याचे आवाहन केले आहे. वेळेवर, अचूक सूचना आणि आगाऊ तयारीमुळे लाखो लोकांचे प्राण वाचू शकतात, असा इशारा जागतिक पातळीवरून देण्यात आला आहे. यापूर्वी, 2023-24 चा एल निनोचा काळ इतिहासातील पाच सर्वात शक्तिशाली काळांपैकी एक मानला जात होता.

Advertisement
Tags :

.