कुर्दिस्तानच्या अध्यक्षीय निवासस्थानावर ड्रोन हल्ला
इराकच्या कुर्दिस्तानच्या अध्यक्षांच्या निवासस्थानाला लक्ष्य करत एक मोठा ड्रोन हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यामुळे केवळ कुर्दिस्तान नव्हे तर आंतरराष्ट्रीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर अमेरिका अत्यंत आक्रमक भूमिकेत दिसून येत आहे.
अमेरिकेचा इशारा
कुर्दिस्तानच्या अध्यक्षांच्या निवासस्थानावर हल्ला झाल्याचे कळताच अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाने एक वक्तव्य जारी केले आहे. अमेरिकेने या हल्ल्याला ‘भ्याड दहशतवादी कृत्य’ ठरवत याची कठोर शब्दांमध्ये निंदा केली आहे. कुर्दिस्तान आणि इराकचे सार्वभौमत्व तसेच सुरक्षेसोबत आम्ही मजबूतीने उभे आहोत. या कटामागे जे चेहरे आहेत, त्यांचा भांडाफोड करत कठोरातील कठोर शिक्षा दिली जावी असे अमेरिकेने म्हटले आहे.
अमेरिका-इराणमध्ये वाक्युद्ध
या हल्ल्याने कूटनीतिक वर्तुळात तणाव निर्माण केला आहे. हल्ल्याच्या काही तासातच अमेरिका आणि इराणदरम्यान आरोपांच्या फैऱ्या झडू लागल्या आहेत. या हल्ल्यामागे इराणकडून पाठबळ मिळणाऱ्या उग्रवादी गटांचा हात आहे. इराणचे समर्थनप्राप्त हे गट क्षेत्रात स्वत:चा वरचष्मा कायम ठेवण्यासाठी अशाप्रकारचे हल्ले करत असल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे.
इराणचे प्रत्युत्तर
इराणने अमेरिकेच्या या दाव्यांना फेटाळले आहे. अमेरिका कुठल्याही ठोस पुराव्याशिवाय इराणला बदनाम करण्याचा कट रचत आहे. अमेरिका अशाप्रकारचे आधारहीन आरोप करत पश्चिम आशियातील स्वत:चे अपयश लपवू पाहत असल्याचा दावा इराणच्या विदेश मंत्रालयाने केला आहे. सध्या कुर्दिस्तानात सुरक्षा यंत्रणा हायअलर्टवर आहेत. या एका ड्रोन हल्ल्याने अमेरिका आणि इराणदरम्यान कटूता अनेक पटीने वाढविली आहे.
फ्रान्सच्या अध्यक्षांची बरजानी यांच्याशी चर्चा
फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी इराकच्या कुर्दिस्तानचे अध्यक्ष नेचिर्वन बरजानी यांच्या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. इराकचे सार्वभौमत्व आणि तेथील कुर्दिस्तान क्षेत्राची सुरक्षा, क्षेत्रीय स्थिरतेसाठी आवश्यक आहे. इराकला वर्तमानात जारी संघर्ष आणि तणावात खेचले जाण्यापासून वाचविण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले जावेत असे मॅक्रॉन यांनी म्हटले आहे.