मंगळूरकडे येणाऱ्या इस्रायली जहाजावर ड्रोनहल्ला
हिंदी महासागरात घटना, भारतीय नौदलाची युद्धनौका मदतीसाठी रवाना : अलर्ट जारी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
हमाससोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान हिंदी महासागरात इस्रायली जहाजाला लक्ष्य करण्यात आले आहे. शनिवार, 23 डिसेंबर रोजी संशयास्पद ड्रोनने हल्ला केल्यामुळे आग लागून इस्रायली व्यापारी जहाजाचे नुकसान झाले. मात्र, यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. हे जहाज कच्च्या तेलाची वाहतूक करत असून सौदी अरेबियातील एका बंदरातून मंगळूरच्या दिशेने येत होते. सागरी एजन्सीने लायबेरियन ध्वजांकित जहाज इस्रायली असल्याचे वृत्त दिले आहे. सध्या अधिकारी या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.
भारतातील वेरवालजवळ इस्रायली व्यापारी जहाजावर ड्रोनने हल्ला केल्याचे वृत्त ब्रिटीश सैन्याच्या युनायटेड किंगडम मेरीटाईम टेड ऑपरेशन्स आणि सागरी सुरक्षा फर्म एम्ब्र्रेने सांगितले. सदर जहाजावर लायबेरियाचा ध्वज असल्याचे समजते. भारतीय तटरक्षक जहाज आयसीजीएस विक्रम अरबी समुद्रात हल्ला झालेल्या व्यापारी जहाजाच्या दिशेने निघाले आहे. भारतीय जहाजाने मदत पुरवण्यासाठी धाव घेताना परिसरातील सर्व जहाजांना सतर्क केले आहे.
गेल्या महिन्यातही हिंदी महासागरात इस्रायली जहाजावर ड्रोन हल्ला झाला होता. त्यानंतर अमेरिकन अधिकाऱ्यांनी हा हल्ला इराणच्या ड्रोनने केल्याचा दावा केला होता. मागच्या महिन्यातच येमेनच्या हुथी बंडखोरांनी लाल समुद्रात भारताकडे येणाऱ्या इस्रायलशी जोडलेल्या मालवाहू जहाजाचे अपहरण केले होते. बंडखोरांनी जहाजातील 25 क्रू मेंबर्सनाही ओलीस ठेवले आहे. अशा स्थितीत इस्रायली अधिकाऱ्यांनी या घटनेचा संबंध हुथी बंडखोरांशी जोडला आहे. येमेनमधील बहुतांश भाग इराण समर्थित हुथी बंडखोरांच्या ताब्यात असून त्यांनी हमासला पाठिंबा जाहीर केला आहे.