गोव्याच्या अरमांडो कुलासो यांना द्रोणाचार्य जीवनगौरव सन्मान
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
गोवा फुटबॉल संघाचे प्रशिक्षक अरमांडो कुलासो यांना शुक्रवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते द्रोणाचार्य जीवनगौरव विभागातील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार प्राप्त करणारे ते गोव्याचे पहिले तर एकूण तिसरे फुटबॉल प्रशिक्षक आहेत.
कुलासो यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक राष्ट्रीय फुटबॉलपटू नावारूपास आले. त्यात भारताचा ऑलटाईम ग्रेट सुनील छेत्रीचा समावेश आहे. याशिवाय त्यांनी महेश गवळी, क्लायमॅक्स लॉरेन्स, अन्वर अली, अँथनी पेरेरा, समीत नाईक यासारख्या खेळाडूंनाही तयार केले. या खेळाडूंनी 2002 सॅफ चषकमध्ये रौप्य, 2005 सॅफ चषकमध्ये सुवर्ण, 2008 सॅफ स्पर्धेत रौप्य, 2012 सॅफ स्पर्धेत सुवर्ण आणि 2002 एलजी चषक स्पर्धेत देशाला सुवर्णपदक मिळवून दिले. सातत्याने असामान्य प्रशिक्षण देत खेळाडू तयार करणाऱ्या प्रशिक्षकांना द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
आय लीग 2 मध्ये स्पोर्टिंग गोवा फुटबॉल संघाचे ते सध्या प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहेत. गेल्या दोन दशकातील धेंपो क्लबचे ते सर्वात यशस्वी प्रशिक्षक म्हणून ओळखले जात असून सर्वात दीर्घ काळ ते या संघाचे मॅनेजर होते. यापूर्वी सईद नईमुद्दिन व बिमल घोष या फुटबॉल प्रशिक्षकांना हा पुरस्कार मिळाला होता.