For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सर्व्हर डाऊनमुळे वाहनचालकांची गैरसोय

10:41 AM Jun 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
सर्व्हर डाऊनमुळे वाहनचालकांची गैरसोय
Advertisement

वाहन परवान्यांसह इतर सर्वच सेवांना फटका

Advertisement

बेळगाव : बेळगाव आरटीओ कार्यालयात सर्व्हर डाऊनच्या समस्येमुळे सर्व सेवा ठप्प होत आहेत. गुरुवारी सर्व्हर डाऊनमुळे वाहनधारकांची गैरसोय झाली. परगावावरून आलेल्या वाहनचालकांना पुन्हा माघारी फिरावे लागले. शुक्रवारीही काही प्रमाणात ही समस्या उद्भवत होती. त्यामुळे वाहनचालकांची अडचण होत असून यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याची मागणी केली जात आहे. लर्निंग लायसन्स, परमनन्ट लायसन्ससह नवीन वाहनांची नेंदणी, जुन्या वाहनांच्या परवान्याचे नूतनीकरण यासह इतर कामांसाठी आरटीओ कार्यालयात वाहन चालकांची ये-जा सुरू असते. परंतु मागील काही दिवसांपासून सर्व्हरच्या अनेक तक्रारी येत आहेत. आरटीओ कार्यालयांमध्ये ‘वाहन 4.0’ या वेबसाईटवरून सेवा दिल्या जातात. बऱ्याचवेळा संपूर्ण देशभर एकच वेबसाईट असल्यामुळे तांत्रिक अडचणी निर्माण होत असतात.

गुरुवारी बेळगाव आरटीओ कार्यालयासह सर्वच उपकेंद्रांमध्ये सर्व्हरची समस्या जाणवत होती. यामुळे वाहनचालकांना तासन्तास रांगेमध्ये उभे रहावे लागले. परवाने मिळविण्यासाठी बाहेरगावचे नागरिक कार्यालयात आले होते. परंतु सर्व्हर नसल्यामुळे त्यांना कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागले. त्यामुळे शुक्रवारी सकाळपासूनच कार्यालयात वाहनचालकांची गर्दी दिसून आली. चलन भरण्यासह इतर कामांसाठी काऊंटरवर वाहनचालक व एजटांच्या रांगा लागल्या होत्या. आरटीओ कार्यालयाचा कारभार काही केल्या रुळावर येताना दिसत नाही. एजंटांमुळे हैराण झालेल्या नागरिकांना आता अधिकारी आणि सर्व्हरचाही त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे एका कामासाठी आठ ते दहा दिवस हेलपाटे मारावे लागत असल्यामुळे नाराजीचा सूर उमटत आहे. त्याचबरोबर ड्रायव्हिंग लायसन्ससाठी दिलेल्या फाईल पुढे सरकत नसल्याची तक्रार वाहनचालकांनी केली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.