कशेडी बंगला मार्गावर वाहनचालकांची कसरत
खेड
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यातील वाहतूक अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आल्याने घाटातून वाहतूक वळवण्यात आली आहे. कशेडी घाटातील मार्गासह कशेडी बंगला मार्गाची दयनीय अवस्था झाली असून वाहनचालकांची कसरत सुरू आहे. खड्डेमय रस्त्यासह धुळीच्या साम्राज्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरूनच मार्गक्रमण करावे लागत आहे. बोगद्यातील वाहतूक बंद झाल्यापासून घाटातून मार्गस्थ होणाऱ्या वाहनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. या मार्गावरून मार्गक्रमण करताना वाहनचालकांना जीवघेणा प्रवास करावा लागतो आहे.
यापूर्वी बोगद्यातून अवजड व हलकी दोन्ही वाहतुकीच्या वाहनांना बंदी घालण्यात आली होती. मात्र, त्यानंतर बोगद्यातूनच अवजड वाहने देखील मार्गस्थ होत होती. यामुळे कशेडी घाटातील मार्गाच्या दुरुस्तीकडे राष्ट्रीय महामार्ग खात्याने जाणीवपूर्वक दुर्लक्षच केले होते. या दुर्लक्षामुळे घाटातील रस्त्याची दैनावस्था झाली आहे. या मार्गावरून काही मोजक्याच एसटी बसेस धावत होत्या.
गेल्या दोन दिवसापासून बोगद्यातील बंद करण्यात आलेल्या वाहतुकीमुळे कशेडी घाटातूनच वाहतुकीस मुभा देण्यात आली आहे. आधीच कशेडी घाटातील मार्गाची दुरावस्था झाली आहे. त्यात आता बेसुमार वाहनांची भर पडल्याने मार्गाची आणखीनच बिकट अवस्था बनली आहे. घाटातील मार्गावर जागोजागी पडलेल्या खड्यांमुळे वाहनचालकांचा जीव टांगणीवर आहे. धुळीच्या साम्राज्यानेही वाहनचालक अक्षरशः मेटाकुटीस आले आहेत. धुळीमुळे वाहनचालकांना काहीही दिसत नसल्याने वाहने हाकताना कसरत करावी लागत आहे.