अर्थसंकल्पाद्वारे आत्मनिर्भर भारताच्यादृष्टीने चालना
खासदार सदानंद तानावडे यांची प्रतिक्रिया
पणजी : विकसित भारत-2047 च्या दिशेने पावले उचलणारा हा अर्थसंकल्प असून त्याचा फायदा गोव्यासारख्या पर्यटन राज्याला होणार आहे. ‘सबका साथ सबका विकास सबका विश्वास’ हे तत्त्व लक्षात ठेवून आत्मनिर्भर भारताच्यादृष्टीने चालना देणारा अर्थसंकल्प असल्याचे गोवा प्रदेश भाजप अध्यक्ष व खासदार सदानंद तानावडे यांनी म्हटले असून त्याचे स्वागत केले आहे. ते म्हणाले की महिला, शेतकरीवर्ग उद्योग अशा सर्वांसाठी हा अर्थसंकल्प लाभदायक असून शेतकऱ्यांसाठी पीएम फसल योजना हितकारक आहे. दुर्बल घटक आणि कमकुवतवर्गाला फायदा मिळावा म्हणून तो अर्थसंकल्प हितकारक आहे. व्याजरहित कर्जयोजना पर्यटन राज्यासाठी समाविष्ट करण्यात आली असून त्याचा लाभ गोव्याला मिळणार असल्याचा दावा तानावडे यांनी केला आहे. जनतेसाठी सदर अर्थसंकल्प सकारात्मक असून गरीब लोकांसाठी 2 कोटी घरे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. गरिबीतून त्यांना बाहेर काढण्यासाठी या अर्थसंकल्पाचा उपयोग होणार आहे. सामाजिक सुरक्षा-व्यवस्था, साधन-सुविधा यांना उत्तेजन मिळावे म्हणून अर्थसंकल्पात तरतूद असून विकसित भारताचे स्वप्न नजरेसमोर ठेवून तो तयार करण्यात आला असल्याचे तानावडे यांनी नमूद केले.
अर्थसंकल्पात पुढील 25 वर्षांचा विचार : मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची प्रतिक्रिया
विकसित भारत - 2047 साठी केंद्र सरकारने मांडलेला अर्थसंकल्प पायाभूत स्वऊपाचा असल्याचे सांगून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्याचे स्वागत केले आहे. पुढील 25 वर्षांचा विचार कऊन हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. गोवा सरकारलाही त्याचा लाभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाचे राज्य सरकारतर्फे स्वागत आहे, असे डॉ. सावंत यांनी नमूद केले.
आश्वासनांचे मायाजाल : युरी आलेमांव
पूर्ण न होणाऱ्या आश्वासनांचे मायाजाल असलेला हा केंद्रीय अर्थसंकल्प असून सर्वसामान्य जनतेवरील महागाईचे, कराचे ओझे कमी करण्यासाठी त्यात काहीच तरतूद नसल्याची टीका विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांनी केली आहे. श्रीमंतांचे चोचले पुरवणारा आणि गरीबांसाठी काहीही नसलेला असा हा अर्थसंकल्प असल्याचे त्यांनी म्हटले आहे.