जिल्ह्यातील ५० हुन अधिक गावांत पिण्याची पाण्याची समस्या
पावसाला विलंब झाल्यास परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता : पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे
बेळगाव : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असल्याने टँकर आणि बोअरवेलच्या पाण्यावर नागरिकांना अवलंबून रहावे लागत आहे. पावसाला विलंब झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अनेक गावांतील विहिरींनी तळ गाठला असल्याने गावकऱ्यांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागले आहे. विशेष करून अथणी आणि रामदुर्ग तालुक्यातील अनेक गावांमध्ये नागरिकांना टँकरची वाट पाहत बसण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यातील 50 हून अधिक गावांमध्ये पाण्याची समस्या असून 55 खासगी बोअरवेलमधून पाणीपुरवठा केला जात आहे. दररोज 156 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
बेळगाव विभागातील बैलहोंगल, सौंदत्ती, रामदुर्ग आणि खानापूर तालुक्यातील 27 गावांमध्ये पाण्याची समस्या कायम असून दररोज 14 टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू आहे. या व्यतिरिक्त 124 खासगी बोअरवेल निश्चित करण्यात आल्या असून त्यापैकी 40 बोअरवेल स्थानिक पातळीवर पाणीपुरवठा करीत आहेत. चिकोडी भागातही परिस्थिती काही वेगळी नाही. अथणी, चिकोडी आणि रायबाग तालुक्यातील 20 ग्रामपंचायतींच्या 28 गावांना टँकर आणि खासगी बोअरवेलच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. या भागात दररोज 42 ट्रीप टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून काही ठिकाणी बोअरवेलची पाणीपातळीदेखील खालावली असल्याने चिंता व्यक्त होत आहे.
सौंदत्ती येथील मलप्रभा जलाशयातील पाण्याची पातळी कमी होत आहे. सध्या जलाशयात 6 टीएमसी पाणी असले तरी त्यापैकी 3 टीएमसी पाणी मृतसाठा (डेड स्टोरेज) आहे. त्यामुळे पिण्यासाठी केवळ 3 टीएमसी पाणी उपलब्ध आहे. सौंदत्ती, मुन्नोळी परिसरातील 8 गावांना आणि रामदुर्ग तालुक्यातील 30 हून अधिक गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी या पाण्याची गरज आहे. शिवाय धारवाड शहराच्या पिण्याच्या पाण्याची गरजही भागवायची आहे. जलाशयाच्या खालच्या भागातील कालव्यामध्ये पाणी सोडण्याची विनंती करण्यात आली आहे. त्या भागात पाणी सोडल्यास बैलहेंगल आणि कित्तूर परिसरात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे हे एक आव्हान आहे.