'ओपन बार' झाले तात्पुरते 'क्लोज', राज्याकडून कारवाई कायम सुरु राहणार का?
मोहिमेचे आदेश पहिल्यांदाच आल्याने उघड्यावर दारू पिणाऱ्यांच्या विरोधात पूर्ण ताकतीने कारवाईला सुरुवात
By : सुधाकर काशीद
कोल्हापूर : बसायला मोकळी जागा, थंडगार वाहणारे वारे. इतर लोकांची फारशी वर्दळ नाही आणि इथे का बसलाय, असे कोणीही कोणाला विचारायच्या भानगडीत पडत नाही. त्यामुळे अशा जागी कोल्हापुरात ओपन बार फुललेले आहेत. पण अशा ओपन बार विरोधात राज्यस्तरावरूनच कारवाई किंवा मोहिमेचे आदेश पहिल्यांदाच आल्याने उघड्यावर दारू पिणाऱ्यांच्या विरोधात पूर्ण ताकतीने कारवाईला तरी सुरुवात झाली आहे. बाटल्या, ग्लास, फुटाणे, खारीडाळ असले खाद्य जागेवरच सोडून मध्येच पळावे लागत आहे.
अशा कारवाईचा हा कायदा जुनाच आहे, तो नव्याने आला आहे, अशी कोणतीही परिस्थिती नाही. पण उघड्यावर सार्वजनिक ठिकाणी बसून मद्यपान केले तर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कायद्यानुसार सहा महिने, दुसऱ्यांदा पुन्हा कारवाई झाली तर एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा आहे. ही शिक्षा नक्कीच तशी दारू पिणाऱ्यांची नशा खाडकन् उतरावी, इतकी कडक आहे. पण राज्य उत्पादन शुल्क विभागाने अशी कारवाईची मोहीम यापूर्वी कधी ताकदीने चालवलीच नाही आणि उघड्यावर बसून दारू पिणाऱ्यांना तर अशी काही शिक्षा असते, हे माहीतच नाही. त्यामुळे ठिकठिकाणी ओपन बार बिनधास्त सुरू झाले आहेत.
शाळांची मैदाने, मोकळे माळ, अर्धवट बांधकामाची ठिकाणे, क्रीडांगणे म्हणजे उघड्यावर दारू पिण्याची जागा हे ठरूनच गेले आहे. तेथे रात्री इतकी वर्दळ की, दारू प्या, पण येथे बाटल्या फोडू नका. ग्लास, बाटल्या टाकून जाऊ नका, असे विनंती फलक लावायची वेळ आली आहे. कोल्हापूरचा विचार केला तर उघड्यावर दारू पीत बसून गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चा करण्याचीच या जागा असल्यासारखी परिस्थिती आहे. अगदी आजही आहे. बारमध्ये बसून दारू पिणे खिशाला परवडत नाही म्हणून मोकळ्dया हवेत बसून दारू पिण्याचा मार्ग मद्यपींनी निवडला आहे.
पंचगंगा नदीकाठावर आता झगझगीत लाईटचा प्रकाश आहे. त्यामुळे पंचगंगेचा घाट त्याला अपवाद झाला आहे. नाही तर पंचगंगेचा घाट रात्री मद्यपींच्याच ताब्यात अशी परिस्थिती होती. रंकाळ्यावरही तीच परिस्थिती. महात्मा गांधींचा देशातला सर्वात उंच पुतळा असलेल्या वरूण तीर्थवेश गांधी मैदानात तर काही ग्रुपनी आपापल्या जागा ठरवूनच घेतलेल्या. ब्रह्मपुरी पिकनिक पॉईंटवर तर एक माजी नगरसेवक आणि त्याची गॅंग रात्री उशिरापर्यंत पडून. त्यामुळे त्या नगरसेवकाच्या नावाने ब्रह्मपुरी पिकनिक पॉईंट ओळखला जाऊ लागला.
तपोवनचा माळ म्हणजे आचार्य विनोबा भावेंच्या श्रमदानाचा. पण रात्री ही जागा मद्यपीच्या ताब्यात गेली. ही जागा इतकी ऐसपैस की तिथे लोळले तरी त्यांना विचारायला कोणी येत नाही आणि विचारायला जायचे कोणाचे धाडस नाही. पंचगंगा स्मशानभूमीच्या वाटेवर बुधवार पेठेपासून काही अंतरावर दगडी कट्टा आहे. दारू ही आरोग्याला घातक असली तरी चक्क स्मशान वाटेच्या कट्ट्यावरती बसूनही ओपन बार सुरू राहिला. साऱ्या शहराची तहान भागवणाऱ्या कळंबा तलावावरही हीच स्थिती. जो विभाग उघड्यावर दारू पिणाऱ्यांवर कारवाई करणार, त्या एक्साईज ऑफिसला लागून असलेल्या दुधाळी मैदानातला एक कोपरा तर केवळ मद्यपानासाठीच राखीव झाला.
रात्री विशिष्ट ठिकाणी लोक दारू प्यायला बसतात, म्हटल्यावर खाद्य विक्रेते आणि शीतपेयाचा व्यवसायही तेथे सुरू झाला. अशा उघड्या ठिकाणी दारू पिणे अधिकृतच आहे, असे वाटण्यासारखी परिस्थिती झाली. पहिला पेग होईपर्यंत सारे शांत त्यानंतर पुढे-पुढे मात्र गाणी, दंगा, विनोद ,शिवीगाळ, मोबाईलवर गाणी लावून धिंगाणा सुरू राहिला. आजूबाजूचे लोक अक्षरश: वैतागले. पण कोणाशी वाकडे घ्यायचे म्हणून लोक सहन करत राहिले. याहून पुढचा प्रकार काही धाबा आणि हॉटेलचालकांनी सुरू केला. जेवण घेणाऱ्यांना मद्यपान करायचे असल्यास त्यासाठी वेगळा कोपरा त्यांनी राखीव ठेवला. तेथे दारूही विकत मिळू लागली,
या साऱ्याचा आता अतिरेक झाला. केवळ कोल्हापूर नव्हे तर राज्यात सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात ओपन बार सुरूच राहिले. आणि आता मात्र प्रत्येक आठवड्याला कारवाईचा अहवाल प्रत्येक जिह्याच्या एक्साईज विभागाने द्यायचा, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांनी आदेशच काढले. दरम्यान, या कारवाईची सुरूवात नादेंडमधून झाली असून कारवाईची ही मोहीम आता राज्यभर पोहोचली आहे. दरारा असलेली ज्येष्ठ मंडळी नाहीत कोल्हापुरात केवळ फक्त ओपन बार नाहीत तर कोल्हापुरात गांजाचच् धूर ही ओपन आहे. त्यासाठी अशा मोकळ्dया जागांचा वापर आहे. तरूणांना विनाशाकडे नेणारी ही व्यसने आहेत. अगदी
फार पूर्वीची गोष्ट नाही, पण आपल्या भागात जर असे ओपन बार किंवा गांजाची विक्री असेल तर त्या भागातील ज्येष्ठ मंडळी, तालमीचे कार्यकर्ते या विरोधात तुटून पडत होते. भावी पिढीला या व्यसनापासून रोखत होते. पण आता तशी दरारा टिकवून असलेली ज्येष्ठ मंडळी कमी झाली आहेत. त्यामुळे कोल्हापुरात कोणच कोणाला ऐकत नाही, अशी परिस्थिती झाली आहे.