Drenej Line Bawada: तब्बल 50 वर्षानंतर बावड्यात ड्रेनेजलाईनच्या कामाचा मुहूर्त
'खोदाई केलेले रस्ते पुन्हा त्याच किंवा त्यापेक्षा चांगल्या दर्जाचा व्हावे'
कोल्हापूर : केंद्र शासनातर्फे राबवण्यात येत असलेल्या अमृत-२ अभियानाअंतर्गत कसबा बावडा-लाईन बाजार परिसरात मलनिस्सारण (ड्रेनेज लाईन) टाकण्याचे काम सुरू झाले आहे. या प्रकल्पासाठी एकूण २६ किलोमीटर लांबीच्या ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी ३१ कोटी ९६ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. काम वेळेत पूर्ण होण्याबाबत मात्र शासंकता व्यक्त होत असली तरी ५० वर्षांची ड्रेनेजची मागणी पूर्ण होत असल्याने बावडेकरांमध्ये समाधान आहे.
खोदाई केल्यानंतर रिस्टोरेशन दर्जेदार होत नसल्याचे अनुभव असल्याने नागरिकांमध्ये संताप आहे. ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामाची गुणवत्ता आणि दर्जा कायम चांगला राखला जाईल, अशी ग्वाही अमृत योजना प्रकल्पाचे सहाय्यक अभियंता सुरेश पाटील, सल्लागार आर. के. पाटील आणि सेवानिवृत्त शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी शुक्रवारी श्रीराम सोसायटी येथे ग्रामस्थांसोबत झालेल्या आढावा बैठकीत दिली.
ड्रेनेज लाईन टाकल्यानंतर रस्ते पूर्वव्रत केले जावेत. कारण अमृत योजनेतील कामातील रस्त्याचे रिस्टोरेशन झालेले नाही. चांगल्या रस्त्यांची अक्षरश: वाट लागली आहे. खोदाई केलेले रस्ते पुन्हा त्याच किंवा त्यापेक्षा चांगल्या दर्जाचा होणे अपेक्षित असल्याचे नागरिकांनी सांगितले.