For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चंद्रावर पाऊल ठेवण्याचे स्वप्न पाहा !

11:20 AM Feb 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
चंद्रावर पाऊल ठेवण्याचे स्वप्न पाहा
Advertisement

अशोक चक्र पुरस्कार विजेते अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचे प्रेरणादायी आवाहन : गोवा राष्ट्रीय पुस्तक महोत्सवात साधला संवाद

Advertisement

पणजी : विकसित भारताचे,अंतराळात जाण्याचे आणि चंद्रावर पाऊल टाकण्याचे स्वप्न पाहून तसे ध्येय ठेवा व प्रयत्न केल्यास ती स्वप्ने निश्चितच पूर्ण होतील, असा सल्ला अशोक चक्र पुरस्कार विजेते फायटर पायलट शुभांशू शुक्ला यांनी दिला. पालक - शिक्षकांनी शाळकरी मुलांची स्वप्ने, ध्येये पूर्ण व्हावीत म्हणून त्यांना सर्वतोपरी पाठिंबा द्यावा, असेही ते म्हणाले.भाऊसाहेब बांदोडकर मैदान, कांपाल -पणजी येथे चालू असलेल्या गोवा राष्ट्रीय पुस्तक महोत्सवात शुक्ला यांच्याशी नॅशनल बुक ट्रस्टचे संचालक युवराज मलिक यांनी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अंतराळातील काही महत्त्वाचे व्हिडिओ दाखवून शाळकरी मुलांसह इतर सर्व श्रोत्यांच्या मनोरंजनात भर घातली.

भारताची ‘ब्रेन पॉवर’ जगात सर्वोत्तम 

Advertisement

अंतराळातून भारत देश कसा दिसतो हे सुद्धा त्यांनी दाखवले आणि ‘सारे जहाँ से अच्छा हिंदुस्थान हमारा’ असा गुणगौरव केला. आकाशाला कोणतीही मर्यादा नाही असे सांगून भारत देशातील लोकांची मेंदूची शक्ती (ब्रेन पॉवर) जगात सर्वोत्तम असल्याचा दावा शुक्ला यांनी केला.

भारतीय माणूस 2040 मध्ये चंद्रावर 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील ‘विकसित भारत - 2047’ साठी सर्वांनी योगदान देण्याची गरज असून 2040 मध्ये चंद्रावर पाऊल टाकण्यास भारतीय माणूस यशस्वी होईल, अशी खात्री त्यांनी वर्तवली.

अंतराळात अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या

अंतराळात जाण्यापूर्वी सुमारे महिनाभर एकांतात राहावे लागले. त्याचे कारण म्हणजे कोणतेही संक्रमण (इन्फेक्शन) होऊ नये आणि अंतराळातील इतरांना त्याचा धोका पोहोचू नये. तेथे फिरताना खूप मजा येते, असे सांगून शुक्ला यांनी त्याचे काही व्हिडिओ प्रसारित केले. अंतराळात माणसाला अजिबात वजन नसते आणि ते पूर्णपणे शून्य होते. माणसांना चेंडूप्रमाणे इकडून - तिकडे व तिकडून - इकडे फेकता येते. तेथे गेल्यावर माणसाची लांबी, उंची वाढते. एकूण 20 दिवस अंतराळात वास्तव्य केले, तेव्हा अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. पृथ्वी हा एक मोठा ग्रह असून अंतराळातून त्याचे निरीक्षण करताना मेंदू अधिक पॉवरफूल होतो असे शुक्ला यांनी नमूद केले.

मेहनत, जिद्द, अभ्यासानेच अंतराळात जाता येते 

शुक्ला यांनी उपस्थितांसमोर अतिशय भावूक होऊन प्रेरणा देणारे विचार व्यक्त केले. आजच्या शाळकरी, तरुण पिढीतील कोणीतरी चंद्रावर जाणारा पहिला भारतीय ठरावा, असे आपले स्वप्न आहे. मेहनत, सातत्य, जिद्द, अभ्यास यातूनच अंतराळात जाण्याचे स्वप्न पूर्ण होते. भारताने अंतराळ संशोधनासाठी अनेक ध्येये आखली आहेत. ती ध्येये साध्य करण्याची जबाबदारी तरुण पिढीवर आहे. त्यासाठी आत्मविश्वासाने पुढे जावे लागेल, असे शुक्ला यांनी सांगितले. आकाशात जाण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही, यापूर्वी नव्हती आणि नंतरही नसणार, असे मत त्यांनी मांडले.

तरुण भारत समूह प्रमुख तथा सल्लागार संपादक किरण ठाकुर यांच्याहस्ते अंतराळवीर फायटर पायलट आणि अशोक चक्र पुरस्कार विजेते सुभांशू शुक्ला यांचा सन्मान करण्यात आला. शाल आणि पुस्तके देऊन ठाकुर यांनी शुक्ला यांचा सन्मान केला. नॅशनल बुक ट्रस्टचे संचालक युवराज मलिक उपस्थित होते. शुक्ला यांच्या वार्तालाप कार्यक्रमास श्रोत्यांचा भरघोस प्रतिसाद लाभला. बसायला जागा नसल्याने शेवटी शाळकरी मुलांना मंडपात खाली बसावे लागले. या भरघोस प्रतिसादाने शुक्लादेखील भारावले आणि त्यांच्यासह मुलांनी ‘जोश’ दाखवला.

अपयश आले तरी पुन्हा प्रयत्न करण्याची तयारी हवी

त्यांच्या वार्तालापाला शाळकरी मुलांसह उपस्थितांनी टाळ्dया वाजवून चांगली दाद दिली. शाळकरी मुलांनी अंतराळात जाण्याबाबत अनेक प्रश्न मांडले. विज्ञान - तंत्रज्ञानाचा अभ्यास, शिस्त व देशासाठी योगदान देण्याची हमी या गोष्टींना महत्त्व असून अपयश आले तरी पुन्हा प्रयत्न करण्याची तयारी हवी, असे शुक्ला यांनी उत्तरे देताना बजावले.

अंतराळात असताना संपूर्ण पृथ्वी घर बनते आणि कोण - कोणत्या देशाचा याला महत्त्व नसते. तर आपण पृथ्वीचा आहे एवढाच भास होतो, असे सांगून शुक्ला यांनी अंतराळातील अनेक अनुभव सांगितले. त्यांचे उपस्थितांनी टाळ्dयांच्या गजरात कौतुक केले. शाळकरी मुलांनी त्यांना जोरदार प्रतिसाद दिला. या वार्तालापातून प्रामुख्याने शाळकरी मुलांना अंतराळातील बरीच माहिती प्राप्त झाली. त्यांच्या विविध प्रश्नातून या क्षेत्रात पुढे जाण्याची जिद्द, भावना दिसून आली. वार्तालापाचा कार्यक्रम संपल्यानंतर सर्व उपस्थितांनी शुक्लांप्रती टाळ्dया देऊन कृतज्ञता व्यक्त केली.

Advertisement
Tags :

.