हायपरसोनिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञानात डीआरडीओला मोठे यश
हायपरसोनिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञानात डीआरडीओला मोठे यश
भारताने हायपरसोनिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाच्या दिशेने एक मोठे कामगिरी साध्य केली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) ‘अॅक्टिव्हली कूल्ड फुल स्केल स्क्रॅमजेट कंबस्टर’च्या दुसऱ्या यशस्वी परीक्षणाची घोषणा केली आहे. हैदराबादमधील संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळेत (डीआरडीएल) हे परीक्षण करण्यात आले, जे 1200 सेकंदांपेक्षा अधिक काळापर्यंत चालले आहे.
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
या परीक्षणात स्क्रॅमजेट इंजिनने 1200 सेकंदांपेक्षा अधिक काळार्पंत यशस्वीपणे काम केले आहे. हे भारताच्या हायपरसोनिक क्षेपणास्त्र कार्यक्रमासाठी मोठे पाऊल मानले जात आहे. यामुळे हायपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्रांसाठी आवश्यक अत्याधिक तापीय भार सहन करण्याची इंजिनची क्षमता प्रमाणित झाली आहे. यापूर्वी जानेवारीमध्ये 700 सेकंदांपर्यंत परीक्षण झाले होते. आता दुपटीहून अधिक काळासाठी इंजिन यशस्वीपणे चालले आहे.
अभूतपूर्व कामगिरी
डीआरडीएलने ‘अॅक्टिव्हली कूल्ड फुल स्केल स्क्रॅमजेट कंबस्टर’चे व्यापक आणि दीर्घ कालावधीचे परीक्षण यशस्वीपणे पार पाडत हायपरसोनिक क्षेपणास्त्रांच्या विकासात एक अभूतपूर्व कामगिरी प्राप्त केली आहे. या दीर्घकालीन परीक्षणाने भारताला अत्याधुनिक एअरोस्पेस क्षमतांमध्ये अग्रणी केले असल्याचे उद्गार संरक्षण मंत्रालयाने काढले आहेत.
तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वपूर्ण
कुठल्याही हायपरसोनिक क्षेपणास्त्र कार्यक्रमासाठी हे तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते, कारण सक्रीय कूलिंगद्वारे शस्त्र अविश्वसनीय वेगाने शेकडो मैलाचे अंतर कापू शकते. या स्क्रॅमजेट कॉम्बस्टरमध्ये तरल हायड्रोकार्बन उष्माशोषक इंधनाचा वापर करण्यात आला आहे. हे एक खास प्रकारचे इंधन असून ते भारताने स्वत: निर्माण केले आहे. तसेच यात उच्च तापमान तापीय अवरोधक कोटिंग लावण्यात आले आहे. हा एक सुरक्षा थर असून तो इंजिनला अत्याधिक उष्णतेपासून वाचवतो. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी स्क्रॅमजेट इंजिनच्या यशस्वी जमिनी परीक्षणासाठी डीआरडीओ, उद्योग भागीदार आणि तज्ञांचे अभिनंदन केले आहे.
हायपरसोनिक शस्त्रास्त्रांची सर्वात मोठे वैशिष्ट्या म्हणजे त्यांचा अत्याधिक वेग आणि हवेत दिशा बदलण्याची क्षमता असते, ज्यामुळे त्यांना रोखणे अत्यंत अवघड मानले जाते.
यश अत्यंत महत्त्वपूर्ण
भारत दीर्घकाळापासून स्वदेशी हायपरसोनिक तंत्रज्ञान विकसित करण्यावर काम करत आहे. 1200 सेकंदांपर्यंत यशस्वी संचालन भारत आता केवळ प्रारंभिक परीक्षणांच्या पुढे जात दीर्घकाळापर्यंत स्थिर आणि विश्वसनीय हायपरसोनिक तंत्रज्ञान विकसित करण्याच्या दिशेत पोहोचत असल्याचे दाखवून देते.
निवडक देशांकडेच तंत्रज्ञान
जगात काही निवडक देशच हायपरसोनिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञान बाळगून आहेत. अमेरिका, रशिया, चीन यासारखे मोठे देशच हे तंत्रज्ञान राखून आहेत. आता भारत देखील या गटात सामील होणार आहे.
काय असते स्क्रॅमजेट इंजिन?
?स्क्रॅमजेट एक अत्यंत अत्याधुनिक एअर-ब्रीदिंग इंजिन असून ते हायपरसोनिक वेग म्हणजेच ध्वनीच्या वेगाच्या 5 पट किंवा त्याहून अधिक वेगावर काम करू शकते. यामुळे हल्ला अधिक प्रभावी ठरू शकतो.
?साधारण रॉकेट इंजिन स्वत:सोबत ऑक्सिजन घेऊन झेपावते, तर स्क्रॅमजेट इंजिन वातावरणातील ऑक्सिजनचा वापर करते, यामुळे ते हलके, अधिक वेगवान आणि दीर्घ पल्ल्यापर्यंत मारा करण्यास सक्षम मानले जाते.
कशासाठी होतो स्व्रॅमजेट इंजिनचा वापर
?हायपरसोनिक क्षेपणास्त्र
?हाय-स्पीड ड्रोन
?अत्याधुनिक अंतराळ प्रक्षेपण प्रणाली
?भविष्यातील अत्यंत वेगवान लढाऊ प्लॅटफॉर्म्स