For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दोडामार्गात पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारे बांधण्यात यावीत

12:49 PM May 28, 2025 IST | अनुजा कुडतरकर
दोडामार्गात पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारे बांधण्यात यावीत
Advertisement

सार्वजनिक बांधकामकडे नागरिक , व्यापारी संघाची मागणी

Advertisement

दोडामार्ग – वार्ताहर

दोडामार्ग ते आयी मार्गावरील बीएसएनएल ऑफिस ते पिंपळेश्वर चौकापर्यंतच्या मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावर दोन्ही बाजूंनी गटारे नसल्याने पावसाचे पाणी थेट नागरिकांच्या घरात घुसत आहे. आताच पडलेल्या अवकाळी पावसात अक्षरश: घरात पाणी जाऊन नागरिकांची बरीच तारांबळ उडाली. त्यामुळे तात्काळ त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारे बांधण्यात यावी अशी मागणी नगरसेवक संतोष नानचे, दोडामार्ग तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष सागर शिरसाठ व नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र केणी यांच्याकडे त्यांची सावंतवाडी येथे भेट घेत केली.

Advertisement

सावंतवाडी येथील बांधकाम विभागाच्या कार्यालयात कार्यकारी अभियंता महेंद्र केणी यांची माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संतोष नानचे यांच्या नेतृत्वाखाली दोडामार्ग शहरातील या भागातील शिष्ठमंडळाने आज सोमवारी भेट घेतली. यावेळी दोडामार्ग तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष सागर शिरसाठ, शाम चांदेलकर, सुधीर चांदेलकर, प्रवीण आरोंदेकर, आशीर्वाद मणेरीकर, फोंडू हडीकर, अनिकेत गावकर, विशांत परमेकर, ओंकार पेडणेकर, विनय पेडणेकर, चंद्रशेखर डेगवेकर, शिवम पांचाळ, आदी उपस्थित होते. आताच झालेल्या अवकाळी पावसात बीएसएनएल कार्यालयापासून ते पिंपळेश्वर चौकापर्यंतच्या काही घरांमध्ये व दुकानामध्ये पाणी गेले आहे. त्यामुळे बऱ्याच व्यापाऱ्यांचे व नागरिकांचे अचानक आलेल्या पावसाच्या पाण्यामुळे नुकसान झाले आहे. अवकाळी पडलेल्या पावसात ही परिस्थिती तर अजून संपूर्ण पावसाळा बाकी आहे त्यावेळीही जर असेच पाणी आले तर येथील नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान व अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार असल्याचे नगरसेवक नानचे यांनी श्री. केणी यांच्या लक्षात आणून दिले.

उद्यापासून कामाला सुरुवात होणार – महेंद्र केणी
दरम्यान केणी यांच्या समोर दोडामार्ग शहरातील शिष्टमंडळ दाखल झाल्यानंतर त्यांनी कनिष्ठ अभियंता संभाजी घंटे यांना बोलावून घेतले. एवढ्या किरकोळ कामासाठी नागरिकांना दोडामार्ग वरून थेट सावंतवाडी गाठावी लागते हे तुमच्यासाठी लाजिरवाणी गोष्ट असून ही चुकीचे आहे असेही त्यांनी श्री. घंटे यांना सुनावले. नागरिकांच्या घरा दुकानामध्ये पाणी जात असताना तुम्ही तिथे बसून करता तरी काय ? असाही सवाल घंटे यांना केला. यावेळी घंटे आपली सारवासारव करण्याचे प्रयत्न करत होते. मात्र कार्यकारी अभियंता केणी यांच्यासमोरच नागरिकांनी अधिकारी अनिल बडे व संभाजी घंटे यांच्या अनेक तक्रारी केल्या. हे अधिकारी कोणाचेही फोन उचलत नाही. त्याशिवाय ऑफिसमध्येही नसतात. नक्की कुठे असतात काय करतात कोणालाही माहिती नसते. तुम्ही मुख्य अधिकारी असून आम्हाला निदान भेटता आमच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न करता पण हे तुमचे दोन्ही अधिकारी साधी भेट ही नागरिकांना देत नाहीत. त्याशिवाय कार्यालयात बेजबाबदारपणे ही घंटे नामक अधिकारी वागतात असेही नागरिकांनी घंटे यांच्यासमोरच केणी यांना सांगितले.

येत्या जुलै मध्ये बंदिस्त गटारांचे काम मंजूर होणार – महेंद्र केणी
संतोष नानचे यांनी या ठिकाणची बंदिस्त गटारे करण्यात यावी अशी मागणी फेब्रुवारी महिन्यात निवेदन देत केली होती. त्या संबंधीचा प्रस्ताव देखील शासन दरबारी पाठविण्यात आला आहे येणाऱ्या जुलै महिन्यात काम मंजूर होणार असून येणाऱ्या काळात बंदिस्त गटारे उभारली जातील. तोपर्यंत पाण्याचा निचरा होण्यासाठी जेसीबी किंवा मनुष्यबळाचा वापर करून तात्पुरत्या स्वरूपातील गटारे बांधण्यात येणार असल्याचे महेंद्र केणी यांना उपस्थितांना सांगितले.

येत्या गुरुवारी सर्व कामे झाली पाहिजेत – महेंद्र केणी
मी येत्या गुरुवारी दोडामार्गला भेट देणार असून त्याआधी तात्पुरत्या स्वरूपात गटारे मारून झाली पाहिजेत. कोणत्याही ठिकाणी पाणी साचता नये पाण्याचा योग्य निचरा व्हायला पाहिजे, नागरिकांना चांगली सेवा द्या असे काम करा असे केणी यांनी घंटे यांना बजावले. तसेच मी या कामाबद्दल कोणतेही कारण ऐकून घेणार नाही. काम व्हायलाच पाहिजे असेही केणी म्हणाले. हे काम करताना जे काही सहकार्य लागेल ते आम्ही नागरिक देऊ असेही उपस्थित नागरिकांनी केणी यांच्याकडे स्पष्ट केले.

भेडशी व गोवा रोडवरील गटारे खुली करा – संतोष नानचे
दरम्यान नानचे म्हणाले की, दरवर्षी आम्ही मागणी केल्यानंतर बांधकाम विभाग कामे करणार आहेत काय ? शहरातील सर्व गटारे स्वच्छ करून गाळ काढून पाणी जाण्यासाठी वाट करावी. तसेच कोल्हापूर – चंदगड – तिलारी – दोडामार्ग – अस्नोडा ( गोवा ) हा राज्यमार्ग क्रमांक १८९ दर्जा असलेल्या मार्गावर शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र समोरील रस्त्यावर पावसात मोठ्या प्रमाणात पाणी येऊन रस्त्याला नाल्याचे स्वरूप प्राप्त होते. त्या ठिकाणची गटारे खुली करून पाणी जाण्यासाठी योग्य वाट करावी. तसेच गोवा रोडवरील बस स्टँड च्या समोरील रस्त्यावर पाणी साचते त्या पाण्यासाठीही योग्य निचरा करण्याता यावा तसेच त्या ठिकाणची मोरी देखील खुली करावी अशी मागणी नानचे व उपस्थित नागरिकांनी केल्यानंतर लागलीच श्री. केणी यांनी ही दोन्ही रस्ते खुले करून गटारे साफ करून पाणी जाण्यासाठी वाट करावी असे घंटे यांना सांगितले. तसेच या कामात कोणी अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना नोटीस बजावून बांधकाम विभागाचे गटारे व रस्ते खाली करून नागरिकांना व वाहतूकदारांना योग्य सोय करून द्यावी असेही बजावून सांगितले.

वझरे येथील पुलाचे काम लवकर पूर्ण करा....
दरम्यान दोडामार्ग ते तळेखोल येथील मुख्य रस्त्यावर बांधण्यात येणारे पूल हे ठेकदाराच्या गलथान कारभारामुळे अपूर्ण असून पावसाला तोंडावर आला तरी अजून काम अपूर्णावस्थेत आहे. त्या आतच झालेल्या अवकाळी पावसात वाहतुकीसाठी करण्यात आलेल्या जोड रस्ता देखील वाहून जाऊन वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे कीटवाडी, तळेखोल, वझरे या गावांतील ग्रामस्थांचे बरेच हाल होत आहेत. येणाऱ्या काळात पुलाचे काम दर्जेदार करून पुलाच्या दोन्ही बाजूंनी संरक्षित भिंत बांधण्यात यावीत त्याशिवाय त्या ठिकाणाच्या लगतच्या शेतकऱ्यांना पावसाच्या पाण्यापासून धोका निर्माण होऊ नये यासाठी गटारे बांधण्यात यावी अशीही मागणी संतोष नानचे यांनी केली आहे. त्यावेळी श्री. केणी यांनी संबंधित ठेकेदार प्रताप मूर्ती यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधत मला येत्या चार दिवसात काम पूर्ण केलेले हवे असून ग्रामस्थांची होणारी गैरसोय दूर व्हावी. तसेच मी पाहणीसाठी येणार असल्याचे ठेकेदार मूर्ती यांना सांगितले.

छाया – समीर ठाकूर

Advertisement
Tags :

.