जेएमएफसी न्यायालय आवारात घातली ड्रेनेज पाईप
बेळगाव : जेएमएफसी न्यायालयाच्या आवारामध्ये ड्रेनेजची समस्या गंभीर बनली होती. जिल्हा कौटुंबिक न्यायालयाजवळ असलेल्या कॅन्टीन परिसरात दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे ड्रेनेजची पाईपलाईन घालण्याचे काम करण्यात आले आहे. यामुळे काही प्रमाणात ही समस्या सुटण्याची शक्यता व्यक्त होत आहे. जेएमएफसी न्यायालयाच्या आवारामध्ये जिल्हा कौटुंबिक न्यायालयाची इमारत उभी करण्यात आली. मात्र ड्रेनेज चेंबरची समस्या जैसे थे होती. ड्रेनेज सांडपाण्याची समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे त्या ठिकाणी दुर्गंधी पसरत होती. नव्याने पाईपलाईन घालण्याची गरज होती. ही पाईपलाईन घालण्यात आली आहे. मात्र रस्त्याच्या मधोमध पाईपलाईन घालण्यात आली असून जर पाईपलाईन ब्लॉक झाली तर रस्त्याची खोदाई करावी लागणार आहे.
आणखी समस्या होण्याची भीती
ड्रेनेजची पाईपलाईन एका बाजुने घालणे गरजेचे होते. मात्र रस्त्याच्या मधोमधच घालून त्याची जोडणी केली आहे. आता ही समस्या काही प्रमाणात सुटली तरी त्याठिकाणी नव्याने रस्ता करणेदेखील गरजेचे झाले आहे. मोठी चर रस्त्यावरच मारण्यात आली आहे. त्यामुळे आणखी समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.