चव्हाट गल्लीत ड्रेनेज मिश्रित पाणी समस्या कायम
महानगरपालिका-एलअँडटी विरोधात रहिवाशांतून तीव्र संताप
बेळगाव : ड्रेनेज मिश्रित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात असल्याने चव्हाट गल्ली येथील रहिवाशांनी महानगरपालिका आणि एलअँडटी कंपनीच्या विरोधात आक्रोश व्यक्त केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून चव्हाट गल्लीला सातत्याने गढूळ व ड्रेनेज मिश्रित पाण्याचा पुरवठा केला जात असल्याने रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. महानगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या चव्हाट गल्लीला गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याची समस्या भेडसावत आहे. 24 तास पाणीपुरवठा करण्यासाठी खोदकाम करून पाईप लाईन घालण्यात आली आहे. मात्र अद्यापही 24 तास पाणी मिळालेले नाही. एलअँडटी कंपनीकडून बेळगावकरांना केवळ 24 तास पाण्याचे गाजर दाखविले आहे. उन्हाळ्यात पाण्याची समस्या निर्माण होऊ नये यासाठी एलअँडटीकडून योग्य नियोजन होणे गरजेचे आहे.
मात्र सहा ते सात दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. पाणी सोडण्यात आल्यानंतर केवळ दोन तास पाणी मिळत आहे. पाण्याला दाब नसल्याने व्यवस्थित पाणी मिळणे कठीण झाले आहे. त्यातच चव्हाट गल्लीला गढूळ व ड्रेनेज मिश्रित पाणी पुरविले जात आहे. यापूर्वीही ड्रेनेज मिश्रित पाणीपुरवठ्यामुळे रहिवाशांनी मनपा व एलअँडटी विरोधात आंदोलन केले होते. मात्र अद्यापही ही समस्या सोडविण्यात आलेली नाही. ड्रेनेज मिश्रित पाण्यामुळे रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नागरिकांच्या आरोग्याची समस्या निर्माण झाल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 24 तास पाणीही मिळत नाही. मात्र रहिवाशांकडून 24 तास पाण्याची पट्टी भरून घेतली जात आहे. त्यामुळे या गंभीर समस्येकडे महापालिका व एलअँडटीने लक्ष द्यावे अशी मागणी केली जात आहे.