ड्रेनेज गळतीमुळे अनगोळमधील विहिरींचे पाणी दूषित
मनपाची तात्पुरती मलमपट्टी : नवीन वाहिनी घालण्याची नागरिकांची मागणी
बेळगाव : झेरे गल्ली, अनगोळ परिसरात ड्रेनेजला गळती लागल्याने परिसरातील विहिरींचे पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे ऐन हिवाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. महानगरपालिकेकडे तक्रार केल्यानंतर तात्पुरत्या स्वरुपात दुरुस्ती केली जाते. परंतु, पुन्हा महिनाभरानंतर ड्रेनेजला गळती लागत असल्याने नागरिक वैतागले आहेत. मनपाच्या या भोंगळ कारभारामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. अनगोळ परिसरात अनेक ठिकाणी ड्रेनेज वाहिन्यांना गळत्या लागल्या आहेत. बऱ्याचवेळा ड्रेनेजमधील सांडपाणी ओव्हरफ्लो होऊन बाहेर पडत आहे. अनेक वर्षांपूर्वी घातलेल्या या वाहिनीला ठिकठिकाणी गळती लागत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे. झेरे गल्ली परिसरात चार ते पाच विहिरींचे पाणी ड्रेनेज गळतीमुळे खराब होत आहे. यामुळे नागरिकांसाठी पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
विहिरीतील पाण्याला दुर्गंधी
सांडपाणी झिरपून विहिरींमध्ये साचत असल्याने विहिरींचे पाणी दूषित होत आहे. पाण्याला दुर्गंधी येत असून रंगही बदलत आहे. या परिसरात चार ते पाच विहिरी असून आजूबाजूच्या परिसरातील नागरिक या पाण्याचा वापर करतात. याबाबतची माहिती महानगरपालिकेला दिल्यानंतर कर्मचारी तात्पुरत्या स्वरुपात दुरुस्ती करत आहेत. परंतु, काही दिवसांनी पुन्हा ही समस्या निर्माण होत आहे. ड्रेनेज वाहिनीला वारंवार गळती लागत असल्याने नवीन ड्रेनेज वाहिनी घालण्याची मागणी नागरिकांनी महानगरपालिकेकडे केली. परंतु, निधी नसल्याचे कारण देत हात वर करण्यात आले. परंतु, महानगरपालिकेच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांना दुर्गंधीयुक्त पाण्याचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे रोगराई पसरली जात असून याला महानगरपालिका जबाबदार असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.