For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महालक्ष्मी कॉलनीत ड्रेनेज समस्या

12:06 PM Apr 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
महालक्ष्मी कॉलनीत ड्रेनेज समस्या
Advertisement

ड्रेनेजच्या पाण्यामुळे विहिरी दूषित : त्वरित समस्या सोडविण्याची मागणी

Advertisement

बेळगाव : प्रभाग क्रमांक 41 मध्ये येणाऱ्या वडगाव, आदर्शनगर, महालक्ष्मी कॉलनी येथे ड्रेनेजची समस्या निर्माण झाली आहे. गेल्या वर्षभरापासून ड्रेनेजचे पाणी रस्त्यावरून वाहात आहे. याबाबत स्थानिक नगरसेवक आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना कळवून देखील त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने स्थानिक रहिवाशांतून तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. वडगाव, आदर्शनगर, महालक्ष्मी कॉलनी येथील मुख्य ड्रेनेज लाईन पूर्णपणे ब्लॉक झाली आहे. मॅनहोल ब्लॉक झाला असल्याने पाणी वाहून जाण्याऐवजी चेंबरमधून बाहेर येत आहे. सांडपाणी वाहून जाण्यासाठी जागा नसल्याने ते बाहेर येऊन तेथील प्लॉटमध्ये तुंबले आहे. परिणामी विहिरी आणि कूपनलिकांना ड्रेनेज मिश्ा़dरीत पाणी येत असल्याने परिसरातील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होण्यासह रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.

गेल्या दहा दिवसांपासून डेनेजचे पाणी परिसरात तुंबून असल्याने डासांची समस्या वाढली आहे. महालक्ष्मी कॉलनी, आदर्शनगर येथे ड्रेनेजचे पाणी रस्त्यावरून वाहात जात एका ठिकाणी तुंबले असल्याने त्या ठिकाणी तलावाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. या गंभीर समस्येकडे लक्ष घालून तातडीने समस्या न सोडवल्यास जिल्हाधिकारी व महापालिकेला धडक दिली जाईल, असा इशारा यावेळी येथील रहिवाशांनी दिला आहे. परिसरातील सर्व विहिरींचे पाणी दूषित बनले असल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. गेल्या तीन वर्षांपासून केवळ आश्वासनेच दिली जात आहेत. मात्र, याकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. एप्रिल महिन्यात अशी परिस्थिती असेल तर येणाऱ्या पावसाळ्यात काय? अशी चिंता स्थानिक रहिवाशांना लागून राहिली आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन तातडीने डेनेजची समस्या मार्गी लावावी अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा महालक्ष्मी कॉलनी येथील रहिवाशांनी दिला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.