बापट गल्ली कॉर्नर ड्रेनेजचे झाकण बनले धोकादायक
महानगरपालिकेचे साफ दुर्लक्ष : समस्येची कल्पना देऊनही याबाबत गांभीर्य नाहीच
बेळगाव : बापट गल्ली कॉर्नर येथील ड्रेनेज चेंबरचे झाकण फुटून अनेक दिवस उलटले असले तरीही नवीन झाकण बसविण्याकडे महानगरपालिकेने दुर्लक्ष केले आहे. याबाबत नागरिकांनी स्थानिक नगरसेवकांना अनेक वेळा संपर्क साधून समस्येची कल्पना दिली. तरीदेखील याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्यांना धोका निर्माण झाला असल्याने महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालून ड्रेनेज चेंबरचे झाकण बदलावे, अशी मागणी केली जात आहे. शहर व उपनगरात घालण्यात आलेली ड्रेनेज लाईन अत्यंत जुनी असून, दरवर्षी रस्त्यांचे काँक्रिटीकरण व डांबरीकरण केले जात असल्याने रस्त्यापासून ड्रेनेज लाईन अत्यंत खोलवर गेली आहे. रस्त्याच्या उंचीप्रमाणेच ड्रेनेज चेंबर वाढविले जात आहेत. मात्र, मुख्य लाईन रस्त्यापासून खोल अंतरावर आहे. सध्याची परिस्थिती पाहता जुनी ड्रेनेज लाईन नव्याने घालण्याची गरज आहे.
ड्रेनेज लाईन तुंबत असल्याने विहिरी-कूपनलिकांना दूषित पाणी
मात्र, केवळ चेंबरची उंची वाढविली जात आहे. परिणामी अनेक ठिकाणी वारंवार ड्रेनेज लाईन तुंबत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. परिसरातील विहिरी आणि कूपनलिकांचे पाणी दूषित बनत आहे. डेनेज लाईन तुंबल्याची तक्रार महानगरपालिकेच्या हेल्पलाईनला केल्यानंतर कर्मचारी तातडीने येण्याऐवजी दुसऱ्या दिवशी येऊन समस्या मार्गी लावतात. त्यामुळे जुन्या ड्रेनेज लाईनची समस्या सर्वप्रथम मार्गी लावणे गरजेचे आहे. अलीकडेच शहरातील मुख्य रस्त्यावरील ड्रेनेजचे चेंबर वाढवून त्यावर नवीन झाकणे बसविण्यात आली आहेत.
झाकणांचा दर्जा निकृष्ट असल्याने लवकर खराब
मात्र, झाकणांचा दर्जा निकृष्ट असल्याने ती खराब होत आहेत. काही ठिकाणी चेंबरवरून वाहने गेल्यानंतर झाकणे मोडकळीस येत आहेत. मुख्य रहदारीचा रस्ता असलेल्या बापट गल्ली कॉर्नर येथे ड्रेनेज चेंबरवरील झाकण फुटून अनेक दिवस उलटले आहेत. यामुळे या मार्गावरून पादचाऱ्यांसह वाहनचालकांना धोका पत्करत ये-जा करावी लागत आहे. झाकण बदलण्यात यावे, यासाठी स्थानिक नगरसेवकांकडे नागरिक संपर्क साधत आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे पावसाला सुरुवात झाल्यास धोका निर्माण होणार असल्याने तातडीने झाकण बदलण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे.