जुने गांधीनगर दुर्गामाता रोडवरील ड्रेनेज चेंबरचे काम अर्धवट
बेळगाव : जुने गांधीनगर, दुर्गामाता रोड येथील ड्रेनेजच्या झाकणाची दुरुस्तीनंतर तेथील काम अर्धवट स्थितीत सोडून देण्यात आले आहे. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना धोका निर्माण झाला असून तातडीने अर्धवट काम पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. महानगरपालिकेच्यावतीने शहर आणि उपनगरातील ड्रेनेजच्या झाकणाची उंची वाढविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे ठिकठिकाणी ड्रेनेजच्या झाकणाभोवती खोदाई करण्यात आली आहे. ड्रेनेजची उंची वाढवून त्यावर नवीन झाकण बसविले जात आहे. मात्र खोदण्यात आलेली माती खड्ड्यात न ओढता तसेच सोडून दिले जात आहे.
त्याचबरोबर ड्रेनेज झाकणाभोवती पसरलेली मातीही काही ठिकाणी तशीच पडून आहे. काही दिवसापूर्वी दुर्गामाता रोड गांधीनगर येथेही ड्रेनेज झाकणाची उंची वाढविण्यात आली आहे. मात्र त्याभोवती खोदण्यात आलेला खड्डा बुजविण्यात आलेला नाही. पावसामुळे त्या खड्ड्यात पाणीही तुंबत असून दिवसा तसेच रात्रीच्यावेळी या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. याबाबत नगरसेवक शिवाजी मंडोळकर यांनी महानगरपालिकेकडे अनेकवेळा तक्रार करूनदेखील त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यानंतर महानगरपालिकेला जाग येणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. धोकादायक डेनेज झाकणाभोवती भराव टाकून खड्डा बुजविण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे.