Election 2025 : राधानगरीत ZP, पंचायत समिती निवडणूक विभाग पुनर्रचनेचा मसुदा प्रसिद्ध
तालुक्यातील गट आणि गणांचे पुर्वीचे अनुक्रमांक मात्र बदलण्यात आलेत
By : महेश तिरवडे
राधानगरी : आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी गट आणि गणांची प्रारूप रचना आ सोमवारी जाहीर झाली असून राधानगरी तालुक्यातील जि.प. चे पाच गट आणि पंचायत समितीच्या दहा गणांची प्रारूप रचना 2017 साली झालेल्या निवडणुकीप्रमाणेच पूर्वीसारखे राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राधानगरी तालुक्यातील गट आणि गणांचे पुर्वीचे अनुक्रमांक मात्र बदलण्यात आले आहेत. 2022 पासून प्रलंबित असलेल्या जि. प. आणि पंचायत समितीच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे लवकरच होणार आहेत. त्यासाठी मतदार संघाची प्रारूप रचना सोमवारी जाहीर करण्यात आली आहे.
आगामी निवडणुकीसाठी राधानगरी तालुक्यात राशिवडे बुद्रुक, कसबा तारळे, कसबा वाळवे, सरवडे आणि राधानगरी असे जि.प.चे पाच गट असतील. तर पंचायत समितीसाठी धामोड, राशिवडे बुद्रुक, कौलव, कसबा तारळे, तुरंबे, कसबा वाळवे, सरवडे, सोळांकुर, राधानगरी, फेजिवडे असे एकूण दहा गण राहणार आहेत.
प्रारूप प्रभाग रचनेनुसार जि. प. मतदार संघात असणाऱ्या ग्रामपंचायतीची संख्या (कंसात ग्रामपंचायत संख्या) राशिवडे बुद्रुक (17), कसबा तारळे (20), कसबा वाळवे (15), सरवडे (23), राधानगरी (23). धामोड (15) राशिवडे बुद्रुक (7) कौलव (9) कसबा तारळे (11) तुरंबे (8) कसबा वाळवे (7) सरवडे (9) सोळांकुर (14) राधानगरी (8) फेजिवडे (15)
राधानगरी तालुक्यातील जि. प. मतदार संघापैकी सर्वाधिक मतदार संख्या राधानगरी भौगोलिकदृष्ट्या मतदार संघात जादा राहणार असून पंचायत समिती मतदार संघात सर्वाधिक मतदार संख्या कसबा वाळवे येथील राहणार आहे. प्रारूप रचना जाहीर झाल्यानंतर इच्छुकांना मतदार संघांच्या आरक्षणाचे वेध लागले असून गट व गणावरील आरक्षण जाहीर झाल्यानंतर खऱ्या अर्थाने इच्छुकांच्या हालचाली सुरु असून संभाव्य उमेदवार मतदारांच्या गाटीभेटी, मतदानाचा कल, वाढदिवस, शुभेच्छा देण्यासाठी अनेक गावात दिसत आहेत.
या आदेशाच्या मसुद्यावर नागरिक, संस्था व संबंधित पक्षांनी लेखी हरकती अथवा सूचना २१ जुलै २०२५ पर्यंत जिल्हाधिकारी, कोल्हापूर किंवा संबंधित तहसीलदारांकडे सादर कराव्यात. त्यानंतर प्राप्त होणाऱ्या हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.