महाकुंभमध्ये सादर होणार सनातन बोर्डाचा मसुदा
साधू-संतांनी निश्चित केली तारीख : धर्मसभेचे होणार आयोजन
वृत्तसंस्था/प्रयागराज
महाकुंभच्या सेक्टर 17 मध्ये होणाऱ्या धर्मसभेत 27 जानेवारी रोजी सनातन बोर्डाचा मसुदा सादर केला जाणार आहे. तो दिवस ‘धर्माच्या स्वातंत्र्याचा दिवस’ म्हणून साजरा केला जाणार असल्याची माहिती देवकीनंदन ठाकूर यांनी गुरुवारी निरंजनी अखाड्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. आमचा धर्म स्वतंत्र नाही. आमची मंदिरं सरकारांच्या अधीन आहेत. गुरुकूल बंद झाली आहेत आणि गोमाता रस्त्यांवर भटकत आहेत. आम्हाला आमच्या धर्म आणि संस्कृतीला संरक्षित आणि वाढविण्यासाठी सनातन बोर्डाची गरज आहे. धर्मसभेत सर्व अखाडे, चारही शंकराचार्यांचे प्रतिनिधी आणि सनातन धर्माशी निगडित प्रमुख लोक सामील होतील. जोपर्यंत सरकार सनातन बोर्डाची स्थापना करत नाही तोवर आम्ही कुंभमधून परतणार नाही असे ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे.
सनातन बोर्ड केवळ भारतच नव्हे तर पूर्ण मानवतेसाठी आवश्यक आहे. दहशतवाद, द्वेष आणि अराजकतेला संपविण्याचा मार्ग केवळ सनातन धर्मातूनच मिळू शकतो असे उद्गार जूनापीठाधीश्वर महंत स्वामी यतींद्रानंद गिरी यांनी काढले आहेत. काही लोक गंगेच्या भूमीला वक्फ बोर्डाची असल्याचा दावा रतात. सनातन धर्म सूर्याच्या उत्पत्तिपासून अस्तित्वात असल्याचे अशा लोकांनी समजून घ्यावे. देशाचे अखंडत्व कायम राखण्यासाठी सनातन बोर्डाची स्थापना अत्यंत आवश्यक असल्याचे निरंजनी अखाड्याचे वरिष्ठ महामंडलेश्वर आणि उज्जैनच्या अर्जुन हनुमान मंदिराचे महंत स्वामी प्रेमानंद पुरी यांनी म्हटले आहे.
जेथे श्रद्धा आहे, तेथे सनातन आहे. जर तुम्हाला विश्वास नसेल तर इतिहासात डोकावून पहा, प्रत्येक ठिकाणी सनातनचे ठसे दिसून येतील. सनातन धर्माच्या रक्षणासाठी सनातन बोर्डाची स्थापना अनिवार्य असल्याचे आनंद अखाड्याचे पीठाधीश्वर स्वामी बालकानंद गिरी महाराजांनी नमूद केले. 27 जानेवारी रोजी धर्मसभेदरम्यान धार्मिक नेत्यांच्या उपस्थितीत सनातन बोर्डाच्या मसुद्याला अंतिम स्वरुप देत अधिकृत स्वरुपात तो घोषित केला जाणार असल्याची माहिती अखिल भारतीय अखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत रविंद्र पुरी यांनी दिली आहे.