सातारा शहराचा प्रारुप विकास आराखडा जाहीर
सातारा :
सातारा नगरपालिकेच्यावतीने शहराच्या प्रारुप विकास आराखड्याच्या अनुषंगाने जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र, शहरातील जाणकार जे पालिकेत नेहमी जातात, लोकांचे प्रश्न सोडवतात त्यांना याबाबत विचारणा केली असता ते अनभिज्ञ असल्याचे समजले. दरम्यान, पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी प्रारुप विकास आराखडा जाहीर केलेला असून त्यामध्ये तब्बल 121 बदल सुचवण्यात आलेले आहेत. त्यावरुन हा प्रसिद्ध करण्यात आलेला प्रारुप विकास आराखडा शासनाकडून अंतिम होण्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
सातारा पालिकेच्यावतीने गेल्या 2021 पासून सातारा शहराच्या प्रारुप विकास आराखड्यावर काम सुरु आहे. त्याकरता सातारा पालिकेत एक स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला. त्याची स्वतंत्र यंत्रणा काम करत होती. शहरातील प्रत्येक भागातील माहिती संकलित करुन शहराचा प्रारुप विकास आराखडा तयार करण्यात येत होता. तयार केलेला आराखडाही मध्यंतरी सातारकरांसाठी पालिकेत नकाशासह जाहिर केला होता. त्यावर सुमारे साडेतीन हजार सातारकरांनी आपल्या हरकती नोंदवल्या होत्या. त्यांच्या हरकतीनुसार संबंधित यंत्रणेने बदल करुन त्यावर अभ्यास करुन पुन्हा तो प्रारुप आराखडा अंतरिम अशा स्वरुपात जाहीर केला आहे.
मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी जाहीर केलेल्या या आराखड्यात तब्बल 121 सूचना आहेत. पहिली सुचना करंजे भागातील रस्त्याच्या रुंदीकरणाची आहे. त्यामध्ये नकाशात दर्शवलेला एबीसी या अक्षराने रस्ता 25 मीटर रुंद होता त्याऐवजी 18 मीटर इतका रुंद करण्यात आला आहे. तसेच तर काही ठिकाणी 18 मीटरचा रस्ता 15 मीटरचा करण्यात आला आहे. काही भाग हा वगळून हरीत पट्ट्यात समाविष्ट करण्यात आला आहे. कण्हेर प्रकल्पाचा उजवा कालवा व लोणंद रस्त्याच्या उत्तर भागातील वेण्णा नदीपर्यंत ते पुर्वेकडील पुणे हमरस्त्यापर्यंतचे क्षेत्रातील विकास परवानगी अनुज्ञेय करतेवेळी किमान 0.20 हेक्टर पेक्षा जास्तीच्या क्षेत्रात विकास परवानगीवेळी विनीमयातील तरतूदीनुसार किमान आवश्यक खुल्या व सुविधा क्षेत्राव्यतिरिक्त जास्तीचे 15 टक्के क्षेत्र म्युनसिपल पर्पजसाठी आरक्षित करुन नगरपालिकेकडे टीडीआर, एफएसआय स्वरुपात हस्तांतरीत करणे बंधनकारक राहिल, अशा 121 बदल केलेल्या सूचना जाहीर केलेल्या आहेत.
सातारकरांनी आराखड्याचे अवलोकन करावे
सातारा नगरपालिकेचा नवीन अंतिम मंजुरी आराखडा जाहीर केलेला आहे. अंतिरम रुप दिलेला आराखडा लवकरच वरिष्ठ स्तरावर पाठवला जाणार आहे. सातारा शहरातील सुज्ञ नागरिकांनी पालिकेतून जावून जुन्या आणि नव्या आराखड्याचे अवलोकन करावे. प्रारुप आणि अंतिम प्रसिद्ध केलेल्या आराखड्यात काही बदल दिसत असतील तर संबंधित प्रशासनाकडे सूचना दाखल कराव्यात.
महारुद्र तिकुंडे, सामाजिक कार्यकर्ते