Accident: दुचाकी-चारचाकीच्या धडकेत डॉक्टर महिला जागीच ठार, शिरोळमधील घटना
जांभळीतील अपघातात हरोलीच्या महिला डॉक्टर ठार, अपघातानंतर वाहन चालक फरार
कोल्हापूर (शिरोळ) : येथे महिंद्रा जिटो चारचाकी व मोपेड यांच्यात झालेल्या अपघातात डॉक्टर महिलेचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी १ मे २०२५ सकाळी पावणे दहाच्या सुमारास घडली. अपघातात मोपेड वरील डॉ. स्नेहल विजय उपाध्ये (वय 30 रा. हरोली ता. शिरोळ) या महिलेचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी महिंद्रा जिटो (क्र. एम एच 09 ई एम 7109) चालक सूर्यकांत अण्णा कुरडे (रा. नांदणी ता. शिरोळ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून आरोपी फरार आहे.
अधिक माहिती अशी, हरोली येथील डॉ. स्नेहल उपाध्ये या आपल्या मोपेडवरून जांभळीमार्गे कार्यालयीन कामासाठी जात होत्या. जांभळी येथील तानाजी रणखांबे यांच्या घरासमोर आल्यानंतर महिंद्रा जिटो या भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनाने रस्त्याच्या विरुद्ध बाजूला असलेल्या मोपेडला धडक दिली. या धडकेत मोपेडवरील स्नेहल उपाध्ये या गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
यावेळी अपघातस्थळी नागरिकांनी मोठी गर्दी झाली होती. घटनेची माहिती मिळतात शिरोळ पोलिसांनी पंचनामा केला. याप्रकरणी शिरोळ पोलिसात गुन्हा दाखल झाला असून अभिजीत कांतीनाथ ऐनापुरे (रा. हरोली, ता. शिरोळ) यांनी फिर्याद दिली आहे. घटनेनंतर संशयित आरोपी वाहन चालक सूर्यकांत कुरडे हा जखमी महिलेची मदत न करता व अपघाताची माहिती पोलिसांना न कळवताच फरार झाला असून अधिक तपास शिरोळ पोलीस करीत आहेत.