राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत डॉ .वसुधा मोरेंना सुवर्णपदक
क्रीडा प्रतिनिधी । सिंधुदुर्ग
महाराष्ट्र योगशिक्षक संघटना संचलित व महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित राज्यस्तरीय योगासन स्पर्धेमध्ये 65 वर्षावरील वयोगटातून सिंधुदुर्गच्या योग अभ्यासिका डॉ. वसुधा मोरे यांनी सुवर्णपदक पटकावत योग क्रीडा प्रकारात राज्यस्तरावर सिंधुदुर्गचा झेंडा फडकवला. मागील राज्यस्तरीय स्पर्धेत त्यांना रौप्यपदावर समाधान मानावे लागले होते. शेगाव येथे नुकत्याच संपन्न झालेल्या योगशिक्षक संमेलनात महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशनचे उपाध्यक्ष सतीश मोहगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. मोरे यांना सन्मानित करण्यात आले. राज्यस्तरावर पार पडलेली ही स्पर्धा ऑनलाईन घेण्यात आली. स्पर्धेत डॉक्टर मोरे यांनी 65 वर्षावरील वयोगटातून आपला सहभाग दर्शविला होता. या गटातून 39 स्पर्धक सहभागी झाले होते. या सर्वांना मागे टाकत डॉ. वसुधा यांनी प्रथम क्रमांक पटकावत राज्यस्तरावर आपल्या कामगिरीची छाप पाडली. दोनच वर्षांपूर्वी मणक्याची मोठी शस्त्रक्रिया झाली असूनही जिद्द ,मेहनतीच्या जोरावर त्यांनी हे यश खेचून आणले. त्या जिल्ह्यातील तज्ञ योगशिक्षिका आहेत. योगामध्ये मास्टर्स केल्यानंतर आता त्या पीएचडी करत आहेत. महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशनच्या त्या जिल्हाध्यक्ष आहेत. जिल्ह्यासह विदेशातही योगाच्या प्रचार आणि प्रसारात त्यांचा मोठा वाटा आहे.