जयानंद मठकर व्याख्यानमालेत आज डॉ. श्रीरंग गायकवाड
वारकरी चळवळीवर व्याख्यान
सावंतवाडी : प्रतिनिधी
श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी आयोजित स्वातंत्र्य सैनिक जयानंद मठकर व्याख्यानमाला २०२५ अंतर्गत शनिवार १२ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता वारकरी चळवळ : इतिहास आणि वर्तमान या विषयावर 'तरुण भारत' कोल्हापूर आवृत्तीचे संपादक आणि संत साहित्याचे अभ्यासक डाॅ. श्रीरंग गायकवाड यांचे व्याख्यान होणार आहे. अध्यक्षस्थानी संत साहित्याचे अभ्यासक देवदत्त परुळेकर, वेंगुर्ले आहेत. सायंकाळी ६ वाजता हे व्याख्यान होणार आहे.महाराष्ट्राच्या लोकजीवनावर सर्वाधिक प्रभाव टाकणारी चळवळ म्हणून वारकरी चळवळीकडे पाहिले जाते. आषाढी कार्तिकीची पंढरपूरची वारी, वारकरी संतांचे साहित्य व कीर्तन परंपरा यांमधून मराठी संस्कृती आणि मानसिकता यांची जडणघडण होत गेली आहे. ही चळवळ केवळ अध्यात्म आणि भक्तीमार्गाच्या प्रसारापुरती मर्यादित नव्हती. लोकजागर, समाज प्रबोधन, समता-बंधुत्व-मानवता यांसारख्या शाश्वत मानवी मूल्यांची रुजवण अशा गोष्टींसाठीही ती महत्त्वाची होती. स्वातंत्र्यानंतर आपण स्वीकारलेल्या लोकशाही संविधानामध्येही हीच मूल्ये ठळक असल्याचे दिसून येते. गांधी, आंबेडकर, साने गुरुजी, विनोबा अशा राष्ट्रीय नेत्यांनाही वारकरी चळवळीच्या साहित्याने प्रभावित केले होते. वारकरी चळवळीचा हा इतिहास डाॅ. गायकवाड यांच्या व्याख्यानातून जाणून घेता येणार आहे. त्याचबरोबर या समताधिष्ठित मानवी मूल्यांचा आग्रह धरणा-या वारकरी परंपरेची आजच्या वर्तमानात काय स्थिती आहे? आजचे वारकरी, कीर्तनकार ज्ञानेश्वर तुकोबांचा वारसा पुढे नेतायत की त्यांनाही या बिघडलेल्या काळाने ग्रासले आहे? याचाही ऊहापोह या व्याख्यानातून केला जाणार आहे.संत साहित्याचे डोळस अभ्यासक म्हणून ख्यातकीर्त असलेल्या डाॅ. गायकवाड यांच्या ओघवत्या शैलीतील विवेचन ऐकणे ही एक पर्वणीच असते. त्यासाठीच या वर्षीच्या व्याख्यानमालेची सांगता करणा-या या व्याख्यानाला अवश्य उपस्थित राहण्याचे आवाहन श्रीराम वाचन मंदिरचे अध्यक्ष प्रसाद पावसकर, कार्याध्यक्ष संदीप निंबाळकर, सचिव रमेश बोंद्रे आणि प्रवीण बांदेकर यांनी केले आहे.