डॉ. रेड्डिज लॅबरोटरीज समभाग वधारला
वृत्तसंस्था, मुंबई
औषध क्षेत्रातील कंपनी डॉ. रेड्डिज लॅबरोटरीजचा समभाग सोमवारी शेअरबाजारात जवळपास 6 टक्क्यांची तेजी अनुभवताना दिसला. यायोगे या क्षेत्रात व निफ्टी 50 निर्देशांकात समभाग आघाडीवर राहिला होता. कंपनीने सप्टेंबरअखेरच्या तिमाहीचा निकाल जाहीर केला आहे. याअंतर्गत कंपनीने जुलै ते सप्टेंबर तिमाहीत 925 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा प्राप्त केला आहे.
मागच्या वर्षापेक्षा नफा कमी असला तरी तसा कमी नव्हता. याचाच सकारात्मक परिणाम समभागावर दिसून आला. कंपनीचा देशातला औषध विक्रीचा व्यवसाय 17 टक्के वाढीसोबत 1850 कोटी रुपयांवर पोहचला आहे. दीर्घकाळासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांची मागणी भारतात मजबूत दिसून आली.
मागच्या तिमाहीच्या तुलनेत कंपनीच्या कामकाजात यावेळी सुधारणा दिसून आली. कंपनीने खर्चात बचत करताना व्यवसायात मजबूती दाखवण्याचे काम केले. कंपनी सध्या जेनरिक सेमाग्लूटाइड व बायोसिमीलर या औषधावरही काम करते आहे. या नव्या औषधांच्या जोरावर व्यवसायात भविष्यात कंपनीला चांगली कामगिरी पार पाडता येण्याची शक्यता सांगितली जात आहे. यासाऱ्या सकारात्मक गोष्टींचा कंपनीच्या समभागावर सोमवारी परिणाम दिसला आहे. समभाग 6.62 टक्के म्हणजेच 81 रुपयांनी वाढत 1310 रुपयांवर बंद झाला.
