डॉ. रामकृष्ण आंबिये : ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व
मूळ पेडणे तालुक्यातील बावाखानवाडा येथील व सध्या परळ-मुंबई येथे स्थायिक संतकवी सोहिरोबानाथ आंबिये यांचे सहावे वंशज डॉ. रामकृष्ण ऊर्फ मधूभाई यशवंत आंबिये (वय 94) यांचे 31 ऑगस्ट रोजी निधन होऊन आज बारा दिवस पूर्ण होत आहेत. यानिमित्त त्यांच्या जीवन-कार्यावर टाकलेला हा प्रकाशझोत.
डॉ. रामकृष्ण आंबिये यांचा जन्म 4 फेब्रुवारी 1931 रोजी मुंबईत झाला. मिताहार, चहा सोडून त्यांना एकही व्यसन नव्हते. फिरण्यात व भरपूर मित्रमंडळींच्या कोंडाळ्यात वेळ व्यतीत करणे, आजन्म अविवाहित ब्रह्मचर्य जीवन हे दीर्घायुष्याचे रहस्य असल्याचे ते म्हणत असत. संतकवी सोहिरोबानाथ आंबिये जयंतीवेळी तसेच गणेश चतुर्थीच्यावेळी ते पालयेला मूळ घरी आप्तेष्ट, नातेवाईक तसेच मित्रमंडळींसोबत येत असत.
डॉ. आंबिये यांचे प्राथमिक शिक्षण मुंबई येथील महापालिकेच्या शाळेत झाले होते. नंतर राजमोहन, दुसऱ्या महायुद्धाच्यावेळी सिंधुदुर्गातील कुडाळ हायस्कूल, वर्षाने मुंबईला परत व एक वर्ष धगोठा हायस्कूल, मॅट्रिकपर्यंत विल्सन नंतर सायन्सला विल्सन कॉलेजात होते. आई-वडील, सहा भावंडे या परिस्थितीमुळे घरची आर्थिक स्थिती जेमतेम तर मित्र-नातलगांनी केलेले आर्थिक साहाय्य, शिष्यवृत्ती यांच्या जोरावर त्यांनी मुंबईतील पॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये संशोधन करून डॉक्टरेट मिळविली व यथावकाश तेथे विभाग प्रमुखपदही मिळविले होते. टाटा स्मारक केंद्रात कर्करोग व संबंधित संशोधन कार्यात वावरताना नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ तसेच अन्य अनुभवसंपन्न शास्त्रज्ञ यांच्याशी त्यांच्या गाठीभेटी झालेल्या होत्या. अमेरिकन सरकारची ‘फुलब्राईट-हेज’ ही पाठ्याशिष्यवृत्ती त्यांना लाभलेली होती. येथेही त्यांनी कर्करोगविषयक संशोधन केले होते. कुटुंबातला मोठा मुलगा म्हणून वडिलांच्या निधनानंतर त्यांनी भावंडांचा भार खांद्यावर घेतला होता. कुठेही आत्मप्रौढी नाही अथवा कुणाबद्दल तक्रार नव्हती. अजातशत्रू. उलट आयुष्य रसिकतेने व चवीचवीने जगण्याची ओढ त्यांना होती. अमेरिकेत संधी असताना भारतात परत येऊन इथल्या रामरगाड्यात त्यांनी स्वत:ला झोकून दिले होते. डॉ. आंबिये यांनी जीव-रसायनशास्त्राच्या क्षेत्रात पीएच.डी. मिळविली होती. पॅन्सर व जैव-वैद्यकीय शास्त्रात 35 वर्षे संशोधन केलेले होते. शिक्षणाविषयीची आत्यंतिक ओढ, उदारमतवादी दृष्टिकोन, विज्ञानाचे अभ्यासक असूनही मानव्यविद्या, जीवन समृद्ध करणाऱ्या अनेक कला याविषयी त्यांना आस्था वाटते. संवादातून त्यांची समाजाविषयीची ओढ तसेच रसिकता दिसून येत होती. डॉ. आंबिये जरी विज्ञान क्षेत्रात अनेक वर्षे वावरले तरी क्रीडा, संगीत, नाट्या याविषयी त्यांना प्रेम होते. अनेक कलाकारांच्या ते संपर्कात होते. मुंबई येथे वास्तव्यास असले तरी पालये गावचे हृदयबंध त्यांनी टिकवून ठेवले होते.
डॉ. आंबिये यांचे मुंबईमधील चिखलवाडीतल्या भागीरथी निवासामध्ये काही काळ वास्तव्य होते. नंतर परळ-मुंबईला राहत असले तरी जुन्या जागी, जुनी माणसे यांच्याकडे त्यांच्या चकरा चालू होत्या. ‘खेड्यामधले घर कौलारू’प्रमाणे बावाखानवाडा-पालये (ता. पेडणे) येथील संत सोहिरोबानाथ आंबिये वास्तू वडिलोपार्जित घर त्यांना खुणावत होते. दरवर्षी होणाऱ्या संतकवी सोहिरोबानाथ जयंतीवेळी तसेच गणेश चतुर्थीवेळी ते याठिकाणी उपस्थिती लावायचे. याठिकाणी येऊन आपल्याला समाधान लाभत असल्याचे डॉ. आंबिये म्हणत होते.
बावाखानवाडा-पालये येथील वडिलोपार्जित घर अर्थात संत सोहिरोबानाथ यांची तीनशे वर्षांपूर्वीची माडी असलेली वास्तू अजूनसुद्धा डौलाने उभी आहे. गोवा मुक्तिसंग्रामावेळी देशभरातून येणारे राजकीय पुढारी, कार्यकर्ते यांच्या बैठका या वास्तूच्या माडीवर भरल्या होत्या. साहित्यिक पु. ल. देशपांडे यांनीही या वास्तूला भेट दिली होती. अनेकांनी या नाथांच्या वास्तूला भेट देऊन समाधान व्यक्त केले होते. ज्येष्ठ संवादिनीवादक पं. तुळशीदास बोरकर यांनीही या घरी भेट दिली होती. त्यावेळी एक एकेरीवादनाचा कार्यक्रम घडवून आणला होता. यातून डॉ. आंबिये यांचे कलारसिकत्त्वही दिसून यायचे.
डॉ. आंबिये यांना वाचनाचे भारी वेड. गोवाविषयक, व्यक्तीविषयक जे-जे काही साहित्य प्रसिद्ध होते, त्याचे ते संग्रह करीत होते. मुंबई येथे प्रसिद्ध होणाऱ्या ‘सारस्वत चैतन्य’ या नियतकालिकेमध्ये गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याविषयीचा त्यांचा लेख प्रसिद्ध झाला होता. या लेखाबद्दल आपले कौतुक झाल्याचे डॉ. आंबिये अभिमानाने सांगायचे.
समाजकारण हे त्यांच्या रक्तातच होते. आयुष्याची 35 वर्षे डॉ. रामकृष्ण आंबिये यांनी मुंबईतील टाटा स्मारक केंद्रात निरनिराळ्या पदांवर काम केले होते. विविध विद्यापीठांत व्याख्याता व परीक्षक म्हणून काम केले. ठिकठिकाणी देशात-परदेशात संशोधन निबंधांचे वाचन केले. त्यांचे सत्तरपेक्षा अधिक शोधनिबंध विविध शास्त्रीय जर्नल्समधून प्रसिद्ध झालेले होते. पण निवृत्तीनंतर त्यांचे समाजकार्य अधिक फोफावले होते. आठ ते नऊ संस्थांच्या कार्यकारिणीवर ते होते. त्यांच्याकडे ओळखीचे लोक, नातलग व विद्यार्थी यांची वर्दळ होती.
केईएम, जे.जे.टाटा पॅन्सर, मोतीबेन दळवी यासारख्या ऊग्णालयात ऊग्णांना प्रवेश, उपचार व प्रसंगी आर्थिक मदत व इतर देखरेख करणे, हे उद्योग चालू असायचे. धी गोवा असोसिएशन मुंबई या संस्थेतही ते दाखल झाले होते. या संस्थेच्या बैठकांना ते नियमित उपस्थिती लावायचे. तसेच गरजू विद्यार्थी व ऊग्णांना संस्थेतर्फे मदत मिळवून द्यायचे. सारस्वत ब्राह्मण समाज, सारस्वत विद्यार्थी साहाय्यक मंडळी, रा.ब.एस.व्ही. राजाध्यक्ष फॉरेन स्कॉलरशिप संस्था, विल्सन हायस्कूल माजी विद्यार्थी संघ, टाटा मेमोरियल सेंटर, पालये-पेडणे येथील आयडियल इंग्लिश स्कूल, संत सोहिरोबानाथ आंबिये स्मारक समिती गोवा अशा संस्थांशीही डॉ. आंबिये संबंधित होते व कार्य बजावयाचे.
पालये येथील आयडियल इंग्लिश हायस्कूलबद्दल त्यांना आस्था होती. हायस्कूलच्या समाधानकारक निकालाबद्दलही ते समाधान व्यक्त करायचे. या हायस्कूलच्या विकासासाठी डॉ. आंबिये यांनी शैक्षणिक शिष्यवृत्तींबरोबरच शिक्षणाला उपयोगी उपकरणे प्रदान केली होती. संतकवी सोहिरोबानाथ यांच्या जीवन-कार्याचा तसेच त्यांच्या साहित्याचा प्रसार विद्यार्थ्यांपर्यंत व्हावा, असा डॉ. आंबिये यांचा ध्यास होता. संत सोहिरोबानाथांचे पुतळे नको तर त्यांच्या स्मृती जागविण्यासाठी या भागात सुसज्ज हॉस्पिटल व्हावे, अशी त्यांची मागणी होती. ‘एका नाथवंशज संशोधकाचे आत्मकथन’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रकाशित झाले होते. त्याचा प्रकाशन सोहळा मुंबईत झाला होता. या सोहळ्यासाठी गोव्याहून साहित्यिक डॉ. सोमनाथ कोमरपंत यांना खास निमंत्रित करण्यात आले होते. काही वर्षापूर्वी त्यांनी सोहिरोबानाथांच्या भजनांची सीडी प्रकाशित केली होती व त्याचादेखील रीतसर प्रकाशन समारंभ झाला होता.
संत सोहिरोबानाथ आंबिये यांची जन्मतारीख अजूनही सापडत नसून ते संशोधकांसाठी एक आव्हानच आहे. सध्या गुरुप्रतिपदेदिवशी सोहिरोबानाथ आंबिये जयंती साजरी केली जाते. त्यांची जन्मतारीख शोधून काढल्यास आंबिये कुटुंबियातर्फे बक्षीस त्यांनी जाहीर केले होते. एक उच्च विद्याविभूषित डॉ. आंबिये यांच्यासारखे व्यक्तिमत्त्व प्रत्येकाकडे आदरपूर्वक वागत. प्रत्येकाची पाठ थोपटून ममतेने विचारपूस करायचे. साधेपणाने वागणारे हे व्यक्तिमत्त्व जणू मातृ-पितृतुल्य, ऋषितुल्य होते. त्यांच्या निधनामुळे एकप्रकारे आधारस्तंभ कोसळला, असे म्हणावे लागेल. संत सोहिरोबानाथ आंबिये यांच्या जीवन-कार्याचा, साहित्याचा प्रसार करणे तसेच डॉ. रामकृष्ण आंबिये यांचे विचार व कृती पुढे नेणे, हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरणार आहे.
राजेश परब