डॉ. रघुनाथ माशेलकर साधणार सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांशी संवाद
भोसले नॉलेज सिटीत डॉ . माशेलकर साधतील थेट संवाद
सावंतवाडी । प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील भोसले नॉलेज सिटीला बुधवार, दि.२० डिसेंबर २०२३ रोजी भेट देणार आहेत. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी मानांकित डॉ. माशेलकरांसारख्या सुप्रसिद्ध व्यक्तिमत्वासोबत प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी यनिमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना लाभणार आहे.
या दिवशी तीन टप्यात कार्यक्रमाची आखणी करण्यात आलेली असून ती पुढीलप्रमाणे आहे. सकाळी दहा ते बारा या वेळेत डॉ. रघुनाथ माशेलकरांची प्रकट मुलाखत माध्यम सल्लागार जयू भाटकर हे घेतील. यावेळी जिल्ह्यातील एक हजार विद्यार्थी उपस्थित असतील. दुपारी दीड ते पावणेतीन यावेळेत उपस्थित विद्यार्थी डॉ. माशेलकरांशी थेट संवाद व प्रश्नोत्तरे करू शकतील. संध्याकाळी चार ते साडेपाच या वेळेत जिल्ह्यातील विज्ञानप्रेमी लोक, शिक्षक, सामाजिक व सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी यांच्याशी चर्चेकरिता राखून ठेवण्यात आला आहे.
हा कार्यक्रम चराठे, सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग येथील भोसले नॉलेज सिटीच्या कॅम्पसमध्ये आयोजित करण्यात आला असून यानिमित्ताने डॉ. माशेलकर हे पहिल्यांदाच सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ०२३६३-२७३५३५/२७३४५६ अथवा हेल्प डेस्क क्र. ९४०५०९९९६८ वर फोन करून नोंदणी करावी असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.