डॉ. प्रभाकर कोरेंकडून समाजाचा सर्वांगीण विकास
गवीसिद्धेश्वर महास्वामींचे गौरवोद्गार : अंकलीत डॉ. कोरे यांचा 78 वा वाढदिवस साजरा
चिकोडी : भूमीत पेरलेले बीज व हृदयात पेरलेले अक्षर वाया जात नाही, याची डॉ. प्रभाकर कोरे यांना जाणीव असल्याने त्यांनी शिक्षणापेक्षा जीवनातील अनुभव, श्रम यामुळे अनेक संस्थांच्या माध्यमातून समाजाचे ऋण फेडण्याचा प्रयत्न केला आहे. कोरे यांनी केलेले कार्य अद्भूत आहे. जन्म व मृत्यू आपल्या हाती नसतो पण जगायचे कसे? याचे अधिकार आपल्याला मिळालेले असतात. त्यामुळे आपण निसर्गाचे देणे लागतो, ऋणी असतो ते ऋण फेडण्यासाठी म्हणून पुण्य संचय करण्याच्या दृष्टीने परोपकारी कार्य करीत राहावे, असे आवाहन कोप्पळ येथील गवी मठाचे गवी सिद्धेश्वर महास्वामीजी यांनी केले.
माजी राज्यसभा सदस्य व केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांच्या 78 व्या वाढदिवसानिमित्त अंकली येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. राज्याचे माजी मुख्यमंत्री व बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. स्वामीजी पुढे म्हणाले, मनुष्याने जीवनात जगाला व निसर्गाला देण्याची भावना मनात ठेवून रोज उत्सव साजरा करावा. देश व जग स्मरणात ठेवेल अशी साधक कामे करावीत. एकच ध्येय ठेवून प्रामाणिकपणाने वाटचाल केल्यास जीवनात यश मिळवता येते, असे सांगितले.
व्देष समोर ठेवून राजकारण करणारे आम्ही नाही
डॉ. प्रभाकर कोरे म्हणाले, प्रकाश हुक्केरी व आपण वर्गमित्र असून प्रकाश हुक्केरी माझ्यापेक्षा सहा महिन्यांनी मोठे आहेत. पती-पत्नी प्रमाणे आमचे दिवसा भांडण ठरलेलेच असायचे पण संध्याकाळी पुन्हा आमच्यात समेट व्हायचा. आजही आमच्यात तीच अवस्था आहे. पण आमच्यात वैयक्तिक कधीही व्देशाचे राजकारण झालेले नाही. व्देष समोर ठेवून आम्ही राजकारण करणारे नाहीत. 160 वर्षांपूर्वी अंकलीकर सरकारांनी अंकली येथे प्रथम कन्नड शाळा सुरू केली. आपल्या घरात सर्वजण मराठी शिकलेले होते. आपणही पहिलीपर्यंत मराठीतच शिकलो होतो.