डॉ. प्रभाकर कोरे यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान
शिक्षण-आरोग्य क्षेत्रातील योगदानाबद्दल सन्मान
चिकोडी : देशाच्या शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात गेल्या अनेक दशकांपासून महत्त्वपूर्ण योगदान देणारे बेळगाव येथील कर्नाटक लिंगायत एज्युकेशन संस्थेचे कार्याध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. प्रभाकर कोरे यांना मंगळवारी नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात आयोजित सोहळ्यात पद्मश्री पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते डॉ. कोरे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. प्रभाकर कोरे यांच्या गौरवामुळे संपूर्ण बेळगाव जिल्हा, सीमाभाग आणि कर्नाटकसह महाराष्ट्रातही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
डॉ. प्रभाकर कोरे यांनी गेल्या चार दशकांहून अधिक काळ केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष म्हणून धुरा सांभाळताना संस्थेचा विस्तार आंतरराष्ट्रीय पातळीवर केला आहे. त्यांच्या सक्षम नेतृत्वाखाली केएलई संस्थेच्या शाळा, महाविद्यालये, तांत्रिक संस्था व वैद्यकीय महाविद्यालयांचे जाळे केवळ कर्नाटक व महाराष्ट्रातच नव्हे तर देश-विदेशातही पसरले आहे. गोरगरिबांना दर्जेदार शिक्षण व अत्यंत कमी खर्चात अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हाच डॉ. कोरे यांच्या जीवनप्रवासाचा मुख्य उद्देश राहिला आहे. बेळगाव येथील सुसज्ज ‘डॉ. प्रभाकर कोरे रुग्णालय’ हे आज संपूर्ण उत्तर कर्नाटक, गोवा आणि दक्षिण महाराष्ट्रातील लाखो रुग्णांसाठी जीवनदायी ठरले आहे.
राष्ट्रपती भवनात आयोजित भव्य पुरस्कार वितरण सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, अनेक केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री व देशभरातील मान्यवर उपस्थित होते. डॉ. कोरे यांना पुरस्कार प्रदान केला जाताना त्यांच्या सुविद्य पत्नी आशा कोरे, त्यांचे सुपुत्र अमित कोरे यांच्यासह कुटुंबीय आणि केएलई संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. डॉ. प्रभाकर कोरे यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल कर्नाटक, महाराष्ट्राचे लोकप्रतिनिधी, सीमाभागातील विविध संस्थांचे पदाधिकारी, राजकीय नेते व हितचिंतकांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
शेवटच्या घटकेपर्यंत शिक्षण-आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी कटिबद्ध : डॉ. प्रभाकर कोरे
पुरस्कार स्वीकारल्यानंतर नवी दिल्लीत माध्यमांशी बोलताना डॉ. प्रभाकर कोरे यांनी अत्यंत विनम्र भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, हा सन्मान केवळ माझा वैयक्तिक नसून केएलई संस्थेचे संस्थापक ‘सप्तर्षी’, संस्थेचे सर्व आजीव सदस्य, प्राध्यापक, कर्मचारी आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या लाखो जनतेचा आहे. या पुरस्कारामुळे समाजाप्रती असलेली माझी जबाबदारी आणखी वाढली असून शेवटच्या घटकेपर्यंत शिक्षण आणि आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी मी कटिबद्ध राहीन, असे सांगितले.