For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डॉ. किरण ठाकुर अमृतमहोत्सव पदार्पण सोहळा सांगलीत

12:55 PM Apr 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
डॉ  किरण ठाकुर अमृतमहोत्सव पदार्पण सोहळा सांगलीत
Advertisement

सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच डॉ. ठाकुर यांच्या नागरी सत्काराचे आयोजन : उद्यापासून तीन दिवस सायंकाळी 5 वाजल्यापासून कार्यक्रम

Advertisement

सांगली  : दै. तरुण भारतचे समूहप्रमुख, सल्लागार संपादक आणि लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. किरण ठाकुर यांच्या 74 व्या वाढदिवसानिमित्त सांगली शहरात स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.  अमृतमहोत्सवी वर्ष पदार्पणानिमित्त दि.5, 6 व 7 एप्रिल रोजी सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच डॉ. किरण ठाकुर यांचा नागरी सत्कार होणार आहे. तीनही दिवस हा कार्यक्रम सायंकाळी पाच वाजल्यापासून सुरू होईल. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गौरव समिती स्थापन झाली असून, 5 एप्रिल रोजीच्या कार्यक्रमासाठी सांगली, मिरज रोडवरील चिंतामणराव कॉमर्स कॉलेज केपीएसपी स्कूल ग्राऊंड सज्ज झाले आहे. दि. 5 ते 7 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

या सोहळ्यास सांगलीकरांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखालील गौरव समितीतर्फे करण्यात आले आहे. या स्नेहमेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. भव्य वॉटरप्रूफ शामियाना उभारण्यात आला आहे. तर वालचंद महाविद्यालय आणि चिंतामणराव कॉमर्स कॉलेज चौकात स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे नगरसेवक युवराज गायकवाड यांच्या हस्ते शुक्रवारी सायंकाळी या स्वागत कमानीचे श्रीफळ वाढवून पूजन करण्यात आले. यावेळी लोकमान्य सोसायटी आणि तरुण भारत संवादचे कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

Advertisement

शिवप्रताप महानाट्याने प्रारंभ

रविवार दि. 5 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता या सोहळ्याला सुरूवात होणार आहे. छत्रपती शिवरायांचा जाज्ज्वल्य इतिहास जिवंत करणारा शिवप्रताप हा अनोखा कार्यक्रम होणार आहे. तर सोमवार दि. 6 एप्रिल रोजी राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या गायिका सावनी रवींद्र यांचा अजरामर गीत अविष्कार होणार आहे. याच दिवशी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, माजीमंत्री आ. जयंतराव पाटील, आ. सुरेश खाडे, आ. विश्वजीत कदम, आ. सुधीर गाडगीळ आणि खा. विशाल पाटील, आ. रोहित आर.आर.पाटील, आ. सत्यजित देशमुख, आ. सदाभाऊ खोत, आ. सुहास बाबर, आ. गोपीचंद पडळकर यांच्यासह महापौर, उपमहापौर, स्थायी सभापती, जिल्हा परिषदेचे नवनियुक्त अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

मान्यवरांचा होणार गौरव

सांगलीमधील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करणार आहे.

मराठमोळ्या इन्स्ट्रुमेंटल म्युझिकल प्रोग्रॅमचे आकर्षण

पुणे जिल्हा आणि परिसरातील लोककलाकार आणि मराठमोळ्या वाद्य मेळ्यातील अनेक दुर्मीळ वाद्ये यांचा एक इन्स्ट्रुमेंटल म्युझिकल प्रोग्रॅम सांगलीत प्रथमच सादर होणार आहे. या सर्व कार्यक्रमाची सांगलीकरांना उत्सुकता लागली असून विविध संघटना, संस्थांना गौरव समितीने तीनही दिवस कार्यकमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मंगळवारी स्नेहमेळावा

मंगळवार दि.7 एप्रिल रोजी स्नेहमेळाव्याचे आयोजन केले असून, जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून डॉ. किरण ठाकुर यांच्यावर प्रेम करणारे नागरिक, हितचिंतक, तरुण भारतचे वाचक, लोकमान्यचे सभासद, ठेवीदार यांच्यासह विविध संस्था, पदाधिकारी उपस्थित राहून डॉ. किरण ठाकुर यांचे अभीष्टचिंतन करणार आहेत.

कार्यक्रमांना उपस्थित रहावे : पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

दि. 5, 6 व 7 एप्रिल या तीनही दिवशी होणारा स्नेहमेळावा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाला सांगलीकरांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन डॉ. किरण ठाकुर नागरी सत्कार समितीचे अध्यक्ष तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले आहे.

Advertisement
Tags :

.