सीमाभागातील 856 गावांमध्ये ! लाडकी बहीण योजना राबवावी
महाराष्ट्र एकीकरण समितीचे डॉ. किरण ठाकुर यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी
पुणे प्रतिनिधी
महाराष्ट्रातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना यशस्वी लागू केली. याच प्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागातील महिला भगिनींसाठी अशीच महत्त्वाकांक्षी योजना लागू करावी, त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे करावा, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते व तरूण भारतचे समूह प्रमुख व सल्लागार संपादक डॉ. किरण ठाकुर यांनी केली.
डॉ. किरण ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंबई येथील वर्षा निवासस्थानी 15 ऑगस्ट रोजी भेट घेतली. या भेटीदरम्यान सादर केलेल्या निवेदनात डॉ. ठाकूर यांनी ही मागणी केली आहे. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेला मिळणारा प्रतिसाद लक्षणीय आहे. अशाप्रकारची मदत सीमावर्ती भागातील 856 हून अधिक गावांमधील मराठी भाषिक महिलांनादेखील मिळणे अपेक्षित आहे, असेही डॉ. ठाकुर यांनी स्पष्ट केले.
तसेच काही महिला लग्नापूर्वी सीमाभागातील मराठी भागात म्हणजे बेळगाव, निपाणी येथे होत्या, लग्नानंतर त्या महाराष्ट्रात स्थायिक झाल्या. या संदर्भाने योजनेतील अटी-नियमांमध्ये शिथिलता असावी. राज्य शासनाने केलेली ही मदत सीमावर्ती भागातील महिलांच्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी मोलाची मदत ठरेल, असे मुख्यमंत्री शिंदे यांना सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे.