डॉ.किरण ठाकुर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव! 72 व्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभीष्टचिंतन
पुणे / प्रतिनिधी
‘तरुण भारत’चे सल्लागार संपादक व ‘लोकमान्य मल्टिपर्पज को ऑप. सोसायटी लि.’चे संस्थापक-अध्यक्ष डॉ. किरण ठाकुर यांचे 72 व्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांसह पुणेकरांकडून रविवारी अभीष्टचिंतन करण्यात आले. डॉ. ठाकुर यांच्या जन्मदिवसानिमित्त पुणेकरांकडून दिवसभर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू होता.
डॉ. ठाकुर यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील पंडित फार्म येथे कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्याला पुणेकरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत त्यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. प्रारंभी संस्कृतचे गाढे अभ्यासक पंडित वसंतराव गाडगीळ व त्यांच्या साधकांनी मंत्रोच्चाराने त्यांचे औक्षण केले. आमदार माधुरी मिसाळ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बंधू प्रसेनजित फडणवीस, शैलेश टिळक, एस. एम. जोशी फौंडेशनचे सुभाष वारे यांच्यासह विविध मान्यवरांनी त्यांचे अभीष्टचिंतन केले. यावेळी ‘लोकमान्य’च्यावतीने सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर, सहकारतज्ञ विद्याधर अनास्कर, सहकार विभागाचे माजी अधिकारी दिनेश ओऊळकर, बुलढाणा अर्बनचे सीईओ शिरीष देशपांडे, ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ, चित्रकार शेखर साने, निवेदिता एकबोटे, डॉ. सतीश देसाई, ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर, ‘सकाळ’चे संपादक सम्राट फडणीस, ‘आज का आनंद’चे संपादक आनंद आगरवाल यांच्यासह अन्य मान्यवरांचा ‘लौकगौरव पुरस्कारा’ने सन्मान करण्यात आला.
प्रास्ताविकात बोलताना ‘लोकमान्य’च्या पुणे विभागाचे क्षेत्रीय व्यवस्थापक सुशील जाधव म्हणाले, की किरण ठाकुर अर्थात मामा यांनी लावलेल्या छोट्या रोपट्याचे आता वटवृक्षात ऊपांतर झाले आहे. आज ‘लोकमान्य’ हा सहकार क्षेत्रातील मोठा ब्रँड झाला आहे. पुण्याशी मामांचे वेगळे ऋणानुबंध असून, येथे त्यांचा मोठा मित्र परिवार आहे. पुण्यावर त्यांचे विशेष प्रेम असून, आज त्याचीच प्रचिती बघायला मिळत आहे. मामांचे नेतृत्व व ‘लोकमान्य टीम’ची साथ यामुळे सहकार क्षेत्रात आज ‘लोकमान्य’ने भरारी घेतली आहे.