डॉक्टर जोगळेकर आणि डोळा
कोल्हापूर :
डोळे हा महत्त्वाचा अवयव. पण त्याची नियमित काळजी घ्यायची नाही. त्रास वाढू लागला की औषधाच्या दुकानातून डोळ्dयात घालण्यासाठी औषधाची एखादी छोटी बाटली घ्यायची. त्यातले थेंब डोळ्यात घालायचे. थोडं बरं वाटायचे, पण पुन्हा त्रास सुरू व्हायचा. मग आता काय करायचं? तर अंबाबाईच्या घाटी दरवाजासमोर असलेल्या डॉक्टर जोगळेकरांच्या दवाखान्यात जायचे, ही कोल्हापूरकरांची ठरलेली पद्धत. नेत्रतज्ञ डॉ. अतुल जोगळेकर यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या वैद्यकीय सेवेतील योगदानाची दखल घेण्याचा हा प्रयास.
तपासणी खोलीत डॉक्टर अतुल जोगळेकर बसलेले असायचे. त्यांचा तो खर्जातला आवाज आणि डॉक्टर या पेशाला शोभणारी गंभीरता जाणवायची. बहुतेक पेशंटना डॉक्टर नावाने ओळखायचे, पेशंटचा डोळा तपासायचे आणि उपचाराला यायला उशीर का केला, असे विचारायचे आणि त्याचवेळी घाबरायचं नाही. डोळा ही साधी गोष्ट नाही, असे म्हणत उपचाराला सुरुवात व्हायची आणि या डॉक्टरांनी उपचार सुरू केले म्हटले, की पेशंटची भीतीच पळून जायची. घाटी दरवाजासमोरचा दवाखाना लहान आणि जिना उतरून खाली पायरीपर्यंत पेशंटची गर्दी असायची.
काही दिवसांनी डॉक्टरांनी राजारामपुरी नवव्या गल्लीत जरा मोठ्या जागेत दवाखाना हलवला आणि रुग्णांच्या गर्दीने तो कायम भरून गेला.
सकाळी सहा-सातपासून डोळ्यावरील शस्त्रक्रिया ते सुरू करायचे. अकरा वाजता पुन्हा ओपीडीत बसायचे आणि रुग्णांची गर्दी संपेपर्यंत दवाखान्यात थांबायचे. डोळ्याच्या चाचणीसाठी बहुतेक वेळा तपासणी कक्षात मंद प्रकाश किंवा अंधार असायचा आणि त्यात डॉक्टरांचा धीरगंभीर आवाज रुग्णांशी संवाद करत राहायचा. रुग्णाला कोणतीही भीती वाटणार नाही, अशा मोजक्या शब्दांत डॉक्टर बोलायचे आणि रुग्णाला आपोआपच मानसिक बळ यायचे. माझ्या डोळ्याचा विकार बरा होणार, या मानसिक समाधानात रुग्ण घरी जायचे.
कोल्हापूर परिसरातील बहुतेक नेत्ररुग्णांची सवय अशी, की डोळ्याचा विकार प्राथमिक अवस्थेत असताना रुग्ण कधीच दवाखान्यात येत नाहीत. बाहेरच्या बाहेर एखाद्या औषधाचे थेंब डोळ्यात टाकण्यावर ते भर देतात आणि आजार वाढल्यावर मग जोगळेकरांच्या दवाखान्यात पळायचे, असे त्यांचे जणू काही ठरलेलेच असते. त्यामुळे कित्येक रुग्णांबाबत विकार खूप पुढे गेलेला असे. पण जोगळेकरांचे वैशिष्ट्या असे, की ते रुग्णांशी संवाद करत, त्याला भीती न घालता उपचार करायचे.
जोगळेकरांनी त्यांच्या दवाखान्यात अत्याधुनिक उपचार साधनांचा वापर केला, जे नवे तंत्र येईल, उपकरण येईल. ते त्यांनी आपल्या दवाखान्यात वापरले. त्यामुळे रूग्णांवर योग्य उपचार होत गेले. मोतीबिंदूच्या आणि इतर शस्त्रक्रिया सकाळी सहा-सात वाजल्यापासून ते करत राहिले. त्यासाठी आधुनिक उपकरणांचा त्यांनी नक्कीच वापर केला. त्यांचे रुग्ण कोकण, उत्तर कर्नाटक, गोव्यापर्यंत होते. त्यांच्यासाठी ते तिकडे दौरा करायचे .आणि हा सारा प्रवास करताना ते मोटार स्वत: चालवत जायचे. ही झाली त्यांच्या स्वत:च्या प्रॅक्टिसची दैनंदिनी. पण इतर नेत्रतज्ञांची कोणतीही अडचण असो, त्यांना जोगळेकर मार्गदर्शन करायचे. त्यांचे चिरंजीव ही परंपरा आता पुढे नेत आहेत. त्यामुळेच ‘डोळा म्हटलं की जोगळेकर’ हे नाते कोल्हापुरात घट्ट झाले आहे.
- सरांचे मार्गदर्शन कधी विसरता येत नाही.
जोगळेकर सरांनी इतर डॉक्टरांना खूप मार्गदर्शन केले. त्यामुळे किचकट उपचारही व्यवस्थित करता आले. सरांचे मार्गदर्शन कधीच विसरता येणार नाहीत.
नेत्रतज्ञ संजय घोटणे, आनंद ढवळे, अभिजीत तगारे.