शक्तीपीठ महामार्ग विकासासाठी असेल तर जनतेवर दडपशाही का ?
शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे डॉ. जयेंद्र परुळेकर यांचा आरोप
सावंतवाडी । प्रतिनिधी
शक्तीपीठ महामार्ग जनतेच्या विकासासाठी आहे, पर्यटन विकासासाठी आहे मग अशी दडपशाही का करण्यात येत आहे. विरोध मोडून काढून, वेळ आली तर फटके मारून हा महामार्ग रेटून करण्याचा अट्टाहास का आहे? यामध्ये काहीतरी काळेबेरे नक्की आहे यात शंका नाही. असा आरोप शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे डॉक्टर जयेंद्र परुळेकर यांनी केला आहे. काल शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीची सभा सावंतवाडी येथे यशस्वीपणे पार पडली. मुसळधार पाऊस असूनही प्रकल्पग्रस्त बाराही गावांतील ग्रामस्थांनी सभेला आवर्जून उपस्थित राहून मोठा प्रतिसाद दिला. त्यांचे पडसाद देखील सरकार दरबारी उमटताना दिसू लागले आहेत. शक्तीपीठ महामार्गाला विरोध होऊ लागल्यावर सत्ताधारी राज्यकर्त्यांचा पोलिस यंत्रणेवर दबाव वाढू लागला आहे.सावंतवाडी पोलिस स्थानकाचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक यांनी बारा गावातील पोलिस पाटलांची तातडीची मिटिंग घेऊन कडक निर्देश दिलेले आहेत. गावांमध्ये शक्तीपीठ महामार्ग विरोधात कुठलीही बैठक होत असेल किंवा त्या दृष्टीने प्रबोधन करण्यासाठी कोणीही तज्ञ, सामाजिक, पर्यावरण कार्यकर्ते गावात येत असतील तर लगेच पोलिस स्थानकाला कळविण्याचे सक्त आदेश दिलेले आहेत असे परूळेकर यांनी म्हटले आहे