For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शक्तीपीठ महामार्ग सिंधुदुर्गच्या माथी मारण्याचा महायुती सरकारचा घाट

03:35 PM Apr 16, 2025 IST | अनुजा कुडतरकर
शक्तीपीठ महामार्ग सिंधुदुर्गच्या माथी मारण्याचा महायुती सरकारचा घाट
Advertisement

डॉ .जयेंद्र परुळेकरांचा आरोप ; जमीन अधिग्रहणासाठी लावले जातायत नीस

Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

स्थानिक जनतेने कुठल्याही प्रकारची मागणी न करता शक्तीपीठ महामार्ग सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या माथी मारण्याचा घाट राज्यातील महायुती सरकारने घातलेला आहे.असा आरोप उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रवक्ते डॉक्टर जयेंद्र परुळेकर यांनी केला आहे. त्या दृष्टीने सदर सहा पदरी महामार्गाचा सर्व्हे देखील सुरू झालेला आहे. जागोजागी सदर महामार्गासाठी जमीन अधिग्रहण करण्यासाठी नीस लावण्यात येत आहेत.गेळे,आंबोली पारपोली,वेर्ले,नेनेवाडी,उडेली,फणसवडे,घारपी, फुकेरी,तांबोळी,डेगवे,बांदा अशा बारा गावांतून हा महामार्ग जाणार आहे. या पैकी बहुतेक गावे ही इकोसेन्सिटीव्ह जाहीर करावीत असे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत, तसेच हा वाईल्ड लाईफ काॅरिडाॅरचा अविभाज्य भाग आहे. १०० मीटर रूंदीच्या या महामार्गासाठी लाखो वृक्ष तोडले जाणार आहेत. आधीच वृक्षतोड बंदी असताना या पट्ट्यात बेसुमार वृक्षतोड सुरू आहे.त्यात या महामार्गासाठी होणारी वृक्षतोड या जैवविविध निसर्गासाठी मृत्यूची घंटा ठरेल यात वाद नाही असेही परुळेकर यांनी म्हटले आहे. सह्याद्री पट्ट्यातील आणि घाटाच्या पायथ्याशी असलेल्या या गावांमध्येच नाही तर आजूबाजूच्या अनेक गावांमध्ये पिण्याच्या आणि शेती बागायतीच्या पाण्याचे स्त्रोत बंद होऊन मोठीच समस्या भविष्यात निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.एवढ्या मोठ्या वृक्षतोडीमुळे आज हत्ती,गवेरेडे,माकड,सांबरे यांचा जो त्रास शेती बागायती करणाऱ्या शेतकऱ्यांना होत आहे तो कित्येक पटीने वाढणार ह्यात शंका नाही.हत्ती आणि गवेरेड्यांचे हल्ले होऊन अनेक शेतकऱ्यांचे नाहक बळी देखील पुढील काळात जातील हे निश्चित. सामान्य जनतेला नको असलेला ८६००० कोटी रूपयांची जनतेच्या पैशाची लूट करून मुठभर मोठे कंत्राटदार आणि सत्ताधारी राजकीय पुढारी यांचे उखळ पांढरे करणारा हा महामार्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी घातक ठरणार आहे असे मत डॉ . परुळेकर यांनी व्यक्त केले आहे

Advertisement

Advertisement
Tags :

.