For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डॉ. हर्षवर्धन यांचा राजकारणातून संन्यास

06:40 AM Mar 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
डॉ  हर्षवर्धन यांचा राजकारणातून संन्यास
Advertisement

कृष्णनगरचे क्लीनिक प्रतीक्षा करत असल्याचे वक्तव्य : भाजपच्या दिग्गज नेत्याला नाकारली उमेदवारी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भाजपकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर होताच पक्षातील नेत्यांकडून राजकारणातून संन्यास घेण्याचे सत्र सुरू झाले आहे. एकीकडे गौतम गंभीर आणि जयंत सिन्हा यांनी उमेदवारी यादी जाहीर होण्यापूर्वीच सक्रीय राजकारणातून बाहेर पडण्याची घोषणा केली होती. तर आता डॉ. हर्षवर्धन यांनी देखील सक्रीय राजकारणापासून स्वत:ला वेगळे केले आहे. हर्षवर्धन यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत स्वत:च्या निर्णयाची घोषणा केली आहे.

Advertisement

30 वर्षांपेक्षा अधिक कालावधीच्या राजकीय कारकीर्दीत मी सर्व 5 विधानसभा आणि दोन लोकसभा निवडणुका लढविल्या आणि मोठ्या फरकाने विजय मिळविला होता. तसेच पक्ष संघटन, राज्य आणि केंद्र सरकारांमध्ये अनेक प्रतिष्ठित पदांवर काम केले. आता स्वत:च्या मूळाकडे (डॉक्टरी पेशा) परतण्याची अनुमती इच्छितो असे हर्षवर्धन यांनी स्वत:च्या सोशल मीडिया पोस्टमध्ये नमूद केले आहे.

अंत्योदय दर्शनाला मानतो

50 वर्षांपूर्वी गरीब आणि गरजू लोकांना मदत करण्याच्या इच्छेपोटीच जीएसव्हीएम वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसमध्ये प्रवेश घेतला होता. मानवजातीची सेवा हेच माझे आदर्श वाक्य होते. मनाने स्वयंसेवक होत मी नेहमीच रांगेत उभे राहिलेल्या अंतिम व्यक्तीची सेवा करण्याचा प्रयत्न करत राहिलो आहे. अशाप्रकारे मी दीनदयाळ उपाध्याय यांच्या अंत्योदय दर्शनाला मानणारा राहिलो आहे. तत्कालीन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेतृत्वाच्या आग्रहामुळे मी निवडणुकीच्या मैदानात उतरलो. माझ्यासाठी राजकारणाचा अर्थ गरीबी, आजार आणि अज्ञानाशी लढण्याची संधी असा होता असे हर्षवर्धन यांनी नमूद केले आहे.

कोरोना काळात सेवेची संधी

सर्वसामान्य माणसांची सेवा करण्यासाठी मी नेहमीच स्वत:ला झोकून दिले होते. दिल्लीचे आरोग्य मंत्री तसेच दोनवेळा केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणून काम केले आहे. मला प्रथम पोलियोमुक्त भारत करण्याच्या दिशेने काम करण्याची आणि मग कोरोना महामारीदरम्यान त्याचा सामना करणाऱ्या लाखो देशवासीयांच्या आरोग्याची देखभाल करण्याची दुर्लभ संधी मिळाल्याचे हर्षवर्धन यांनी म्हटले आहे.

जबाबदारीपासून पळ काढला नाही

समोर आलेल्या जबाबदारीपासून मी कधीच पळ काढला नाही. उलट त्याला धैर्याने सामोरा गेलो. भारतमातेबद्दल कृतज्ञता, माझ्या सहकारी नागरिकांवरील माझी श्रद्धा तसेच आमच्या घटनेत नमूद मूल्यांवर माझी श्रद्धा राहिली आहे. याचबरोबर भगवान श्रीरामाने मला सर्वात मोठे सौभाग्य दिले जे, मानवी जीव वाचविण्यास मी सक्षम झालो असे उद्गार हर्षवर्धन यांनी काढले आहेत.

बाहेरून आलेल्या नेत्यांना प्राधान्य !

तिकीट नाकारलेल्या बिधुडी यांच्याकडून दु:ख व्यक्त

भाजपकडून दक्षिण दिल्लीचे खासदार रमेश बिधुडी यांना आगामी निवडणुकीसाठी उमेदवारी नाकारण्यात आली आहे. याचे दु:ख बिधुडी यांच्या बोलण्यातून व्यक्त झाले आहे. अनेकदा बाहेरून आलेल्या पाहुण्यांसाठी नवी चादर अंथरली जाते, तर घरातील लोक जुन्या सतरंजीवरच झोपी जातात असे मार्मिक उद्गार बिधुडी यांनी काढले आहेत.

पक्ष नेतृत्वाने कोणता विचार केला माहित नाही. भाजप हा मोठा पक्ष आहे, घराण्यांचा पक्ष नाही. आम्ही लोक विचारासाठी लढणारे लोक आहोत. पक्षात बाहेरून आलेल्या लोकांना मान मिळत आहे. परिवारातील लोक या पाहुण्यांच्या स्वागतासाठी स्वत:चे मन मोठं करत असल्याचे बिधुडी यांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.