Kolhapur : शिवाजी विद्यापीठात डॉ. गोसावींची प्रभारी कुलगुरूपदी नियुक्ती !
शिवाजी विद्यापीठात नेतृत्वाची नवी सुरूवात ; डॉ. गोसावी कार्यरत
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठासाठी नव्याने नियुक्त झालेले प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी शनिवारी कार्यभार स्विकारला. कार्यभार स्विाकारल्यानंतर पहिल्याच दिवशी त्यांनी प्रत्यक्ष कामकाजाला सुरूवात केली. सुसंवाद, विश्वास आणि पारदर्शकता या मूल्यांवर आधारित कार्य करून शिवाजी विद्यापीठाचा नावलौकिक वृद्धिंगत करण्यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करू या, असे आवाहन डॉ. गोसावी यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू असलेल्या डॉ. गोसावी यांची शुक्रवारी शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी नियुक्ती झाली. शिवाजी विद्यापीठात दाखल होताच त्यांनी विद्यापीठाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यास अभिवादन करून मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये प्रवेश केला.
यावेळी त्यांच्यासमवेत पत्नी अर्चना गोसावी होत्या. कुलगुरू दालनामध्ये प्रभारी कुलगुरूपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी अधिकार मंडळांचे सदस्य, शिक्षक व अधिकाऱ्यांशी संवाद साधला. प्रभारी कुलगुरू डॉ. गोसावी यांचे प्रशासनाच्या वतीने व्यवस्थापन परिषद सभागृहात स्वागत करण्यात आले. कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्या हस्ते त्यांचे सपत्नीक स्वागत करण्यात आले.
पहिल्याच दिवशी कामकाजाला सुरूवात
डॉ. गोसावी यांनी पहिल्याच दिवशी प्रत्यक्ष कामकाजाला सुरवात केली. कार्यालयात आलेल्या विविध विभागांच्या नस्ती पाहून त्या मार्गी लावल्या. त्यानंतर पुणे विद्यापीठाच्या पूर्वनियोजित ऑनलाईन बैठकीमध्ये येथूनच सहभागी होऊन मार्गदर्शन केले.