नैसर्गिक प्रसुतीकडे कल वाढण्याची गरज :डॉ. एव्हिटा फर्नांडिस
परिषदेच्या समारोपप्रसंगी उपस्थित डॉ.रणजित किल्लेदार, डॉ. इंद्रनील जाधव, डॉ. मनिषी नागावकर, डॉ. एव्हीटा फर्नांडीस, डॉ. प्रसाद हलकर्णीकर, डॉ. किरण कुर्तकोटी, डॉ. समीर कुडाळकर, डॉ. नीता कुडाळकर, डॉ. गौरी साईप्रसाद ,डॉ. अपर्णा कौलवकर आदी.
कोल्हापूर
असंतुलीत आहार, वेळेत न होणारे लग्न, बदललती जीवनशैली, गर्भनिरोधक औषधांचे वाढते प्रमाण आदींमुळे प्रसुतीवेळी विविध समस्या उद्भवत आहेत. वाढते सिझेरियनचे प्रमाण चिंताजनक असुन नैसर्गिक प्रसुतीकडे कल वाढण्याची गरज असल्याचे प्रतिपादन हैदराबाद येथील स्त्राrरोग व प्रसुती तज्ञ डॉ. एव्हीटा फर्नांडिस यांनी केले.
कोल्हापूर स्त्राrरोग व प्रसुती संघटनेच्यावतीने आयोजित ‘ग्लोरीयस 2024’ या तीन वैद्यकीय परिषदेच्या समारोपप्रसंगी त्या बोलत होत्या. हॉटेल सयाजी येथे रविवारी परिषदेचा समारोप झाला. प्रसुती आजार नसुन ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. नैसर्गिक प्रसुतीसाठी स्त्रियांनी मानसिक तयारी ठेवली तरच नैसर्गिक प्रसुतीचे प्रमाण वाढेल, असा विश्वास डॉ. फर्नांडिस यांनी व्यक्त केला.
डॉ. फर्नांडिस यांनी हायरिस्क प्रसुती विषयावर मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, गर्भधारणेनंतर योग्य ती काळजी न घेतल्यामुळे सिझेरियन हा पर्याय अवलंबावा लागत आहे. सद्यस्थितीत नैसर्गिक प्रसुती करण्याचे प्रमाण कमी झाले आहे, अशी खंत डॉ. फर्नांडिस यांनी व्यक्त केली.
नैसर्गिक प्रसुतीसाठी मिडव्हाईब ही एक नवीन संकल्पना हैदराबाद येथे राबवली आहे. यासाठी अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण देण्यात आले असून महिलेच्या गर्भधारणेपासून प्रसुतीपर्यंत सेविका आहार व व्यायामाची काळजी घेतात. त्यामुळे नैसर्गिक प्रसुतीचे प्रमाण वाढत असल्याचे सांगितले.
परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रसाद हलकर्णीकर यांनी नवनवीन प्रगत तंत्रज्ञान, आधुनिक उपचार पद्धती यांची देवाण-घेवाण परिषदेच्यामाध्यमातून होत असल्याचे सांगितले. सचिव डॉ. इंद्रनिल जाधव म्हणाले, संघटनेच्यावतीने आयोजित परिषदेत यंदा प्रथमच थ्रीडी रोबोटिक लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रियांद्वारे गरीब व गरजू दहा रुग्णांना मोफत शस्त्रक्रियेचा लाभ देण्यात आला.
परिषदेमध्ये सातारा, कराड, सांगली, सोलापूर, रत्नागिरी येथून 350 हून स्त्राrरोग तज्ञ सहभागी झाले होते.यावेळी उपाध्यक्ष डॉ. मनिषी नागांवकर, सचिव डॉ. इन्द्रनील जाधव, डॉ. गौरी साईप्रसाद, खजानिस डॉ. रणजीत किल्लेदार व सहसचिव डॉ. अपर्णा कौलवकर, डॉ. अमोल आपटे आदी उपस्थित होते.
स्त्रीयांमध्ये इंडोमेट्रॅसिसचे वाढते प्रमाण चिंताजनक
स्त्रीयांमध्ये इंडोमेट्रॅसिसच वाढते प्रमाण चिंताजनक बनत आहे. इंडोमेट्रॅसिस हा कर्करोगासारखा आजार आहे. यावर शस्त्रक्रिया हाच पर्याय आहे. शासकीय रूग्णालयात उपचार उपलब्ध नसल्याने रूग्णांना मुंबईला जावे लागते. याचा खर्चही अवाढव्य आहे. यामुळे रूग्णांची गैरसोय होत आहे. मात्र, संघटनेच्यावतीने मोफत व माफक दरात शस्त्रक्रिया केली जात असल्याचे डॉ. हलकर्णीकर यांनी सांगितले.
राष्ट्रीय पातळीवर मार्गदर्शन
जन्मत: अनुवंशिक आजार, व्यंग, जुळी मुले, वंध्यत्व उपचार, महिलांचा रक्तदाब, थ्रीडी अल्ट्रासाउंड उपचार, गर्भधारणेवेळी कर्करोगाचे उपचार, सोनोग्राफी, कायदेशीर बाबी, स्त्रियांच्या मासिक पाळीच्या समस्या, स्त्रियांच्या लैंगिक उपचार पद्धती आदी विषयावर राष्ट्रीय पातळीवरील तज्ञांनी मार्गदर्शन केले.