For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Dr. D. Y. Patil Passes Away : पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे कोल्हापुरात निधन

01:49 PM Aug 04, 2026 IST | NEETA POTDAR
dr  d  y  patil passes away   पद्मश्री डॉ  डी  वाय  पाटील यांचे कोल्हापुरात निधन
Advertisement

                                                      कसबा बावडा येथील यशवंत निवासमध्ये घेतला अखेरचा श्वास

Advertisement

कोल्हापूर : शिक्षण, आरोग्य आणि समाजकारण अशा विविध क्षेत्रांत आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणारे ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व, त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. ज्ञानदेव यशवंत पाटील तथा डॉ. डी. वाय. पाटील (वय 91) यांचे मंगळवारी सकाळी कोल्हापुरात निधन झाले. त्यांच्या निधनामुळे केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर देशातील शैक्षणिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

साध्या शेतकरी कुटुंबातून आपला प्रवास सुरू करून राज्यपालपदापर्यंत पोहोचलेल्या डॉ. डी. वाय. पाटील दादा यांच्या निधनाने एका महान पर्वाचा अंत झाला आहे. डॉ. डी. वाय. पाटील दादा यांच्या यांच्या पश्चात मुलगा डॉ. संजय डी. वाय. पाटील, माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, विजय पाटील, डॉ. अजिंक्य पाटील, मुलगी डॉ. नंदिता पालशेतकर आणि नातू आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक मार्गदर्शक आणि आधारस्तंभ गमावला आहे.

Advertisement

कोरोना काळानंतर कसबा बावडा येथील यशवंत निवास येथे डॉ. डी. वाय. पाटील वास्तव्यास होते. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांची प्रकृती हळूहळू खालावत चालली होती. त्यामुळे घरातूनच त्यांच्यावर उपचार सुरू होते. अगदी 20 दिवसांपूर्वीच त्यांना हृदयविकाराचा झटका देखील आला होता. मात्र त्यातून ते सावरले होते.

सोमवारी 3 ऑगस्ट रोजी दिवसभरात त्यांची प्रकृती खालावत गेली आणि मंगळवारी, 4 ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. डी.वाय.दादा यांच्या निधनाने डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपसह शैक्षणिक संकुलावर शोककळा पसरली.
डॉ. डी. वाय. पाटील यांचे पार्थिव बुधवार, 5 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत त्यांच्या ‘यशवंत निवास‘ (कसबा बावडा, कोल्हापूर) येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

यावेळी कोल्हापूरकरांना आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या हजारो कार्यकर्त्यांना लाडक्या नेत्याचे अंतिम दर्शन घेता येणार आहे. सायंकाळी 4 वाजता यशवंत निवास येथून डॉ. डी. वाय. पाटील यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा निघणार आहे. सायंकाळी 5 वाजता डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज (लाईन बाजार, कसबा बावडा) च्या प्रांगणात त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येंणार आहेत.
कोल्हापूर जिह्यातील अंबप या छोट्याशा गावात 22 ऑक्टोबर 1935 रोजी डॉ. ज्ञानदेव यशवंत पाटील यांचा जन्म झाला.

ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळावे, हा ध्यास डी. वाय. पाटील दादा यांनी आयुष्यभर जपला. त्यांनी 1983 मध्ये नवी मुंबईत ‘रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी‘ची स्थापना केली. आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर, मुंबई आणि पुणे येथे तीनहून अधिक डीम्ड विद्यापीठ आणि 180 पेक्षा जास्त शिक्षण संस्था कार्यरत आहेत, जिथे लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

डॉ. डी. वाय पाटील यांची सार्वजनिक जीवनातील सुरुवात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधून झाली. 1957 ते 1962 या काळात त्यांनी कोल्हापूरचे नगराध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. त्यानंतर 1967 आणि 1972 मध्ये ते पन्हाळा विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा सन्मान म्हणून त्यांची त्रिपुरा आणि बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली, त्यांनी पश्चिम बंगालचा राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभारही समर्थपणे सांभाळला. 2018 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.

शिक्षण आणि समाजसेवेतील अतुलनीय योगदानाबद्दल भारत सरकारने 1991 मध्ये त्यांना ‘पद्मश्री‘ या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले. त्यांना विविध आंतरराष्ट्रीय विद्यापीठांकडून मानद डॉक्टरेट तर शिवाजी विद्यापीठाने ‘डी.लिट‘ पदवीने सन्मानित केले होते.
मंगळवारी सकाळी डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन झाले.

बुधवारी, 5 रोजी सायंकाळी 4 वाजता यशवंत निवास येथून डॉ. डी. वाय. पाटील यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा निघणार आहे. सायंकाळी 5 वाजता डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज (लाईन बाजार, कसबा बावडा) च्या प्रांगणात त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.

Advertisement
Tags :

.