Kolhapur : परभणीचे डॉ. भिसे आता कोल्हापुरातील सीपीआरचे नवे अधिष्ठाता !
कोल्हापुरातील सीपीआरला स्थायी अधिष्ठाता देण्याची मागणी पुन्हा चर्चेत
कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाच्या (सीपीआर) अधिष्ठातापदाचा कार्यभार परभणीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या न्यायवैद्यकशास्त्राचे प्राध्यापक डॉ. सदानंद भिसे यांच्याकडे देण्यात आला आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने बुधवारी सायंकाळी याबाबतचा शासन आदेश काढला आहे. या आदेशावर कक्ष अधिकारी प्रविण कांदे यांची स्वाक्षरी आहे.
दोन महिन्यापूर्वी डॉ. सत्यवान मोरे यांचा अधिष्ठाता पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांच्या जागी सीपीआरच्या कान, नाक आणि घसाशास्त्र विभागाचे प्रमुख, डॉ. अजित लोकरे यांच्याकडे अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. यानंतर दोन महिन्यातच प्रशासकीय कारणास्तव डॉ. लोकरे यांना पदमुक्त करून परभणीचे डॉ. भिसे यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार दिला आहे.
पुढील शासन आदेश होईपर्यंत डॉ. भिसे यांच्याकडे अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. डॉ. भिसे यांनी परभणी येथील स्वतःच्या पदाची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या सांभाळून सीपीआर येथील अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळावा, असे या आदेशात म्हटले आहे. सीपीआरमध्ये रोज १ हजारहून अधिक रूग्ण येतात. जिल्ह्यासह परराज्यातील रूग्णही उपचारासाठी येतात. येथील वैद्यकीय महाविद्यालयासह अनेक विभाग आहेत. त्यामुळे कायमस्वरूपी अधिष्ठाता द्यावा, अशी मागणी होत आहे.