For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डॉ. बाबासाहेबांकडून जगाला मानवतेचा संदेश

10:59 AM Apr 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
डॉ  बाबासाहेबांकडून जगाला मानवतेचा संदेश
Advertisement

डॉ. प्रवीणा के. एस. : जिल्हा प्रशासनाकडून डॉ. आंबेडकर जयंती साजरी : विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती

Advertisement

बेळगाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला कायदा-सुव्यवस्था, अस्पृश्यता निवारण, नागरिकांची मूलभूत कर्तव्ये, समानता, शिक्षण क्षेत्रासह विविध क्षेत्रांमध्ये आपली विशेष मोहर उमटविली आहे. जगाला मानवतेचा संदेश देणारी ही पहिली व्यक्ती आहे, असे प्रतिपादन कडोली येथील प्रौढ सरकारी शाळेच्या साहाय्यक शिक्षिका डॉ. प्रवीणा के. एस. यांनी केले. जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, महानगरपालिका आणि समाज कल्याण खात्याच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून प्रसिद्ध असलेले डॉ. बी. आर. आंबेडकर हे भारताच्या इतिहासातील एक अजरामर व्यक्तिमत्त्व आहे. देशाची घटना निर्माण करताना समाजातील खालच्या वर्गातील समुदायासाठी त्यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत. देशातील दीनदलित समाजासाठी समानता आणि सामाजिक न्याय मिळवून देण्यात त्यांनी आपले जीवन व्यतित केले आहे. समाजातील असमानता दूर करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले आहेत. समाजातील सर्व स्तरातील नागरिकांना न्याय देण्यासाठी परिश्रम घेतले आहेत. सर्वांना समानतेचा हक्क मिळवून दिला आहे. महिला सबलीकरण, सामाजिक सुधारणा याबरोबरच कामगारांचे आरोग्य, चिकित्सा, कामगारांना किमान वेतन, विमा आदी सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून दिल्या आहेत. कायद्याच्या चौकटीत महिलांना समानतेचा हक्क उपलब्ध करून दिला आहे. महिला शिक्षण, उद्योगामध्ये आरक्षण याबरोबरच कृषी, औद्योगिक क्षेत्रातील नागरिकांच्या आर्थिक विकासासाठीही विशेष कार्य केले आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी नितेश पाटील, जि. पं. कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, राजश्री जैनापुरे, पोलीस आयुक्त इडा मार्टीन, जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांचा गौरव

Advertisement

या कार्यक्रमामध्ये जिल्ह्यात दहावीत अधिक गुण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेऊन कुटुंबाचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा मान्यवरांकडून देण्यात आल्या.

धर्मवीर संभाजी चौकातून चित्ररथ मिरवणुकीला चालना

सकाळी डॉ. बी. आर. आंबेडकर उद्यानामध्ये डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला मान्यवरांकडून पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर जिल्हाधिकारी नितेश पाटील, पोलीस आयुक्त एडा मार्टीन, जि. पं. कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी सदाशिवनगर येथील बुद्ध विहारला भेट देऊन महामानवाला अभिवादन केले. यानंतर धर्मवीर संभाजी चौकातून चित्ररथ मिरवणुकीला चालना देण्यात आली.

Advertisement
Tags :

.