For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डॉ.बाबासाहेब आणि भारतीय ‘रुपया’

06:48 AM Apr 14, 2026 IST | Tarun Bharat Portal
डॉ बाबासाहेब आणि भारतीय ‘रुपया’
Advertisement

गेल्या काही वर्षांपासून उद्भवलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक देशांमध्ये अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या अस्थिरतेच्या काळात कच्च्या तेलाच्या किंमतीमधील होत असणारी वाढ, शेअर बाजारातील पडझड, चलन मूल्यातील होणारी मोठी घसरण, निर्यात क्षेत्रात निर्माण होणारी दरी आदी घटकांचा भारतासह अन्य  देशांना महागाईसह समस्यांचे चटके सहन करावे लागत आहेत.  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी  1923 मध्ये सादर केलेल्या

Advertisement

‘द प्रॉब्लेम ऑफ रुपी‘ या ग्रंथाचा आधार घेत भारतीय चलनव्यवस्था, त्यांचे महत्त्व आणि त्यावर आधारित असणारी सामाजिक, आर्थिक प्रगती यांचे सखोल विश्लेषण  आज आपण करणार आहोत.

रशिया-युक्रेन यांच्यातील युद्ध, भारत-पाक यांच्यातील तणावाची स्थिती, बांग्लादेशमधील युवकांच्या आंदोलनामुळे झालेली राजकीय उलथापालथ, नेपाळमधील राजकीय नाट्या आणि सध्या सुरु असलेले मध्य पूर्वेतील अमेरिका, इस्रायल आणि इराण यासह इस्लामिक देशांमधील कुरघोड्या या सर्वाचा परिणाम हा चलन या केंद्रस्थानीच स्थिरावत असल्याचे दिसून येत आहे.

Advertisement

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तत्कालीन परिस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘द प्रॉब्लेम ऑफ रुपी’ या ग्रंथातून भारतातील चलनव्यवस्थेचा सखोल अभ्यास केला. त्यांनी रुपयाच्या अवमूल्यनाचे परिणाम आणि त्याचा गरीब वर्गावर होणारा परिणाम स्पष्ट केला. रुपयाचे मूल्य का घटत होते याचा सखोल विचार करून डॉ. आंबेडकरांनी असे मत मांडले की, रुपयाची सामान्य क्रयशक्ती  (वस्तू व सेवा विकत घेण्याची क्षमता) कमी झाल्यामुळे त्याचे मूल्य घटत होते. सरकारचे मात्र असे मत होते की व्यापार प्रतिकूल असणे (म्हणजे निर्यातीपेक्षा आयात जास्त असणे) हेच विनिमय घटण्याचे खरे कारण असल्याचे बाबासाहेबांनी नमूद केले आहे.

रुपयाचा प्रश्न समजून घेण्यासाठी एक तत्त्व विचारात घ्यायला हवे. एका चलनाचे मूल्य दुसऱ्या चलनात किती आहे, हे पाहताना त्या पहिल्या चलनाचे मोल  (wदूप् ) म्हणजे ते चलन जितक्या वस्तू खरेदी करू शकते) लक्षात घेऊनच ठरवले जाते. उदाहरणार्थ, इंग्रज माणसाला भारतीय रुपयाचे मूल्य तितकेच असेल जितक्या भारतीय वस्तू ते रुपये त्याला मिळवून देतील. समजा, भारतात किमतीची पातळी वाढली आणि इंग्लंडमध्ये ती त्याच्या तुलनेत घटली, तर रुपयाच्या तुलनेत पौंडाचे मोल जास्त होईल. म्हणजेच पौंडाच्या हे दाखविते की जेव्हा कधी रुपयाचा विनिमय घसरला होता, तेव्हा रुपयाची क्रयशक्ती खरोखरीच कमी झालेली होती. दुसऱ्या शब्दांत, भारतात जेव्हा-जेव्हा किमतीची पातळी वाढली तेव्हा-तेव्हा रुपयाची क्रयशक्ती घटून त्याचा विनिमय घसरला. म्हणून, रुपयाचे विनिमय-मूल्य हे शेवटी त्याच्या सामान्य क्रयशक्तीनेच निर्धारित होते, असे मत डॉ. आंबेडकरांनी व्यक्त केले.

इ.स. 1913 ते 1920 या काळात सरकारने चलननिर्मितीच्या अधिकाराचा वापर अविवेकीपणे केला. अपरिवर्तनीय नोटा प्रमाणाबाहेर छापल्या. अर्थात, चलननिर्मितीच्या स्वातंत्र्याचा गैरवापर करून चलनाचा अतिविस्तार केल्यामुळे रुपयाचे मूल्य घटले होते. यावरून डॉ. आंबेडकरांनी असे मत व्यक्त केले की चलनाच्या मात्रेवर प्रभावी मर्यादा असल्या तरच त्याचे मूल्य टिकवून ठेवण्यास पुरेशी ठरते. बाबासाहेबांच्या मते, रुपयाचा विनिमय स्थिर ठेवण्याचा प्रश्न खऱ्या अर्थाने कोणीच विचारात घेतला नव्हता. रुपयांची मात्रा नियंत्रित करून त्याची क्रयशक्ती स्थिर ठेवणे हाच विनिमय स्थैर्याचा खरा मुद्दा होता. या सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष करणारी संपूर्ण विनिमय पद्धत म्हणजेच दुर्बल ठरते. ही पद्धत म्हणजे खरी सुवर्णप्रणाली नव्हती. सुवर्णप्रणाली असलेल्या इंग्लंडच्या तुलनेत भारतातील किमतींची वाढ कितीतरी जास्त होती. याचा सरळ अर्थ असा की सुवर्ण विनिमय पद्धत सुवर्णप्रणाली इतकी कार्यक्षम नसल्याचेही यामधून बाबासाहेबांनी सांगितले.

रॉयल कमिशनसमोर बाबासाहेबांनी दिलेली साक्ष :

इ.स. 1924-25 मध्ये ‘रॉयल कमिशन ऑन इंडियन करन्सी अँड फायनान्स’ समोर बाबासाहेबांनी दिलेली साक्ष भारताच्या वित्तपद्धतीचे परीक्षण करणे व येथील चलनप्रणालीत सुधारणा सुचविणे हे या कमिशनचे काम होते. डॉ. आंबेडकरांनी रुपयाच्या प्रश्नाच्या संदर्भात रॉयल कमिशनपुढे निवेदन सादर केले आणि साक्षही दिली होती.

रुपयाची समस्या सोडविण्याच्या दृष्टीने बाबासाहेबांनी सूचविलेले ठोस उपाय

(1) टांकसाळीमधून मुक्तपणे रुपये तयार करून देणे जसे लोकांसाठी बंद करण्यात आले तसेच ते सरकारसाठीही बंद करण्यात यावे.

(2) योग्य अशा सुवर्ण नाण्यांच्या निर्मितीसाठी टांकसाळ उघडण्यात यावी.

(3) सुवर्ण नाणे आणि रुपया यांच्यामध्ये निश्चित असे प्रमाण ठरविण्यात यावे.

(4) रुपयाचे परिवर्तन सोन्यात करू देऊ नये. सोन्याच्या बदल्यात रुपये देऊ नयेत.

परंतु निश्चित अशा प्रमाणाच्या आधारावर ही दोन्ही नाणी अस्सल कायदेशीर चलन म्हणून व्यवहारात असावीत. उपरोक्त विवेचनावरून लक्षात येते की ब्रिटिश राजवटीतील भारतीय चलनाच्या अस्थिरतेचा उहापोह डॉ. आंबेडकरांनी ‘रुपयाचा प्रश्न’ या प्रबंधात केला आहे. आज सुवर्णप्रणाली अस्तित्वात नाही, किंवा रुपया हे चलन सोन्याशी जोडलेले नाही. तरीसुद्धा भारतीय चलनाच्या संदर्भात त्यांनी मांडलेले विचार हे केवळ ऐतिहासिक महत्त्वाचे ठरून बाजूला सारता येत नाहीत.

बाबासाहेबांच्या मते:

►चलनाची स्थिरता अत्यंत आवश्यक आहे.

►महागाईमुळे गरीब वर्ग अधिक त्रस्त होतो.

►सरकारने योग्य आर्थिक धोरणे आखली पाहिजेत.

►रुपया आणि सामाजिक न्याय.

डॉ. आंबेडकरांचा ठाम विश्वास होता की आर्थिक समता नसल्यास सामाजिक समता साध्य होऊ शकत नाही. त्यांनी सांगितले की, पैसा हा समाजातील विषमता कमी करण्याचे साधन आहे. जर संपत्ती काही लोकांपुरती मर्यादित राहिली, तर समाजात अन्याय आणि असंतोष वाढतो.

डॉ. आंबेडकरांनी कामगारांच्या हक्कांसाठी मोठे योगदान दिले. त्यांनी कामाचे तास, वेतन आणि सुरक्षितता यावर भर दिला. त्यांच्या मते, कामगारांना योग्य मोबदला मिळाल्यासच अर्थव्यवस्था मजबूत होईल.

सागर कांबळे

Advertisement
Tags :

.