Satara News : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकास निधीची कमतरता भासू देणार नाही” ; पालकमंत्र्यांची ग्वाही
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक होणार भव्य आणि सुसज्ज; ५० लाखांचा निधी मंजूर
नवारस्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक हे पाटणचे प्रवेशद्वार असून ते देखणे व सुसज्ज होण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीमधून स्मारकाच्या सुधारणा करण्यासाठी पहिल्या टप्प्यातील कामासाठी ५० लाख रुपये मंजूर झाले असून दुसऱ्या टप्प्यासाठी देखील ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला जाणार आहे.
म्हावशी पेठ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे कामासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन राज्याचे पर्यटन खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.म्हावशी पेठ (पाटण) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या सुधारणा करण्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा मंत्री देसाई यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ते मार्गदर्शन करत होते.
रिपब्लिकन पार्टी ऑ फ इंडिया (ए) चे जिल्हा युबा उपाध्यक्ष प्रतीक गायकवाड, रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष विशाल भोसले, बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल बीर, प्रांताधिकारी सोपान टोम्पे, तहसीलदार अनंत गुरव, गटविकास अधिकारी सरिता पवार, समितीचे अध्यक्षरवींद्र सोनावले, उपाध्यक्ष आत्माराम माने, आप्पासाहेब मगरे, शंकर शिंदे, सचिन सचिन कांबळे, कोषाध्यक्ष मिलिंद कांबळे, सहसचिव रुपेश सावंत, हिशेब तपासणीस संजय जाधव, सहकोषाध्यक्ष प्राणलाल माने, बौद्ध विकास सेवा संघाचे अध्यक्ष भीमराव दाभाडे, राजाराम भंडारे, अशोक देवकांत, कैलास चव्हाण, संजय जाधव आदींसह स्मारक समितीचे पदाधिकारी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच पाटण तालुका, बांधव, भगिनी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, या स्मारकाचा पाया आधीच्या नेतृत्वाने घातला. पण त्यानंतर या ठिकाणी कोणी बळूनही पाहिलं नाही. तालुक्याने २१ वर्षे काही नेत्यांवर विश्वास ठेवून त्यांना आमदारकी व मंत्रिपद दिले, पण त्यांनी डॉ. बाबासाहेबांच्या भव्य स्मारकाकडे कधीच लक्ष दिलं नाही. काही मोजक्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या औपचारिक निवेदनामुळे हे काम प्रत्यक्षात मार्गी लागले.
दरम्यान, यावेळी स्मारक समितीच्या बतीने मंत्री शंभूराज देसाई यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक रवींद्र सोनवले यांनी केले. तर आभार सचिन कांबळे यांनी मानले.