For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डॉ. अंजली निंबाळकरांचा हेगडे-कागेरींवर पलटवार

10:54 AM Apr 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
डॉ  अंजली निंबाळकरांचा हेगडे कागेरींवर पलटवार
Advertisement

10 वर्षे लोटली तरी भाजपकडून आश्वासनांची पूर्तता नाही

Advertisement

कारवार : डॉ. अंजली निंबाळकर यांना राजकारण कळत नाही, असे वक्तव्य केलेल्या कारवार लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांना 7 मे रोजी योग्य तो धडा शिकविणार आहे, असा पलटवार काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांनी केला आहे. त्या शिरसी तालुक्यातील बनवासी येथील काँग्रेसच्या प्रचारसभेत बोलताना पुढे म्हणाल्या, निंबाळकर राजकारणात लहान आहेत असे हेगडे यांनी म्हटले आहे. ते राजकारणात मोठे आहेत आणि म्हणून आपण त्यांच्या वक्तव्यासंदर्भात उत्तर देत नाही. होय, आपण राजकारणात लहान आहे. मोठी व्हायला आपण येथे आलो नाही. आपण समाजसेवेसाठी गरिबांचा उद्धार डोळ्यासमोर ठेऊन येथे आलो आहे, असे स्पष्ट करून निंबाळकर पुढे म्हणाल्या, लोक मेले तरी चालतील तथापि आपण राजकारण सोडणार नाही, या भावनेचे भाजपवाले गरीब, गरीबच राहिले पाहिजेत, कर्जबाजारी बनून शेतकऱ्यांनी आत्महत्या केली पाहिजे या विचारांचे भाजपवाले आहेत. तथापि, काँग्रेसचे सरकार केंद्रात असताना शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले होते. खानापूर येथे घर असतानाही आपण महिन्यातून दोन वेळा येऊन बनवासीवासियांची भेट घेतली आहे. आर. व्ही. देशपांडे यांनीही तेच केले आहे. तथापि, शिरसी येथेच घर असलेल्या आणि सहा वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या विश्वेश्वर हेगडे यांनी किती वेळा बनवासीला भेट दिली याचे उत्तर द्यावे, असे आव्हान पुढे निंबाळकर यांनी दिले.

आग लावली आणि त्यांनी पोलीस व्हॅनमधून पलायन केले

Advertisement

2018 मध्ये होन्नावर येथील परेश मेथा या तरुणाच्या संशयित मृत्यूच्या पाठीमागे काँग्रेसवाल्यांचा हात असल्याचा आरोप भाजपने केला. परेशच्या मृत्यूचे राजकारण करून भाजपने आपली पोळी भाजून घेतली. होन्नावर, शिरसी, कारवार येथे जाळपोळ करण्यात आली. समाजस्वास्थ्य बिघडविण्यात आले. शिरसीत जाळपोळ करण्यात आली आणि पुढे आपला बचाव करण्यासाठी भाजपचे उमेदवार विश्वेश्वर हेगडे यांनी पोलीस व्हॅनमधून घटनास्थळावरून पलायन केले, असा आरोप शिरसीचे आमदार भीमण्णा नाईक यांनी केला. पुढे चौकशीतून मेथा मृत्यू प्रकरणाबाबत सत्य उजेडात आले व भाजपचा खोटारडेपणा जगासमोर आला, असे त्यांनी सांगितले.

खोटे बोलण्यात भाजप आघाडीवर

याप्रसंगी बोलताना जिल्हा पालकमंत्री मंकाळू वैद्य म्हणाले, भाजपने खोटे बोलण्यास सुरुवात केली आहे. 100 दिवसात आश्वासनांची पूर्तता करतो, असे म्हणणाऱ्या भाजपने 10 वर्षे लोटली तरी आश्वासनांची पूर्तता करण्यात यश आलेले नाही. भाजपला खोटे बोलणे तेवढेच जमते, असे त्यांनी सांगितले. हल्याळचे आमदार आर. व्ही. देशपांडे, यल्लापूरचे माजी आमदार व्ही. एस. पाटील, युवा नेते विवेक हेब्बार आदींनी काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

Advertisement
Tags :

.