डॉ. अंजली निंबाळकर निश्चितपणे बाजी मारणार
हल्याळचे आमदार आर. व्ही. देशपांडे यांचा दावा
कारवार : कारवार लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या प्रचारासाठी आपण संपूर्ण कारवार मतदारसंघाचा दौरा केला आहे. आपणाला मिळालेल्या माहितीनुसार यावेळी काँग्रेसच्या उमेदवार डॉ. निंबाळकर निश्चितपणे बाजी मारणार आहेत, असा दावा हल्याळचे आमदार आणि माजी मंत्री आर. व्ही. देशपांडे यांनी केला. रविवारी हल्याळ येथील आमदार आदर्श शाळा क्रमांक एकमधील मतदान केंद्रावर (क्र. 93) देशपांडे यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते पुढे म्हणाले, निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या भाजपचे उमेदवार विश्वेश्वर हेगडे यांचे भांडवल केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी होते. हेगडे यांच्याकडे कोणतेही भांडवल नव्हते. म्हणूनच निंबाळकर यांचा विजय निश्चित आहे. निंबाळकर यांनी आमदार या नात्याने सेवा बजावली आहे. त्यांचा जनतेशी संपर्क आणि संवादही आहे. त्यांनी प्रचारासाठी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे. म्हणून त्यांचा विजय निश्चित आहे, असा विश्वास व्यक्त करून 28 पैकी 17 ते 22 काँग्रेस उमेदवार विजयी होतील, असा दावा केला.