Kolhapur News : जयसिंगपुरात डॉ. आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे जंगी स्वागत
जयसिंगपुरात अवतरले निळे वादळ; 'जय भीम'च्या जयघोषाने परिसर दुमदुमला
जयसिंगपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे जयसिंगपूर नगरीमध्ये रविवारी जंगी स्वागत करण्यात आले. शहरातील प्रमुख मार्गावर निळे झेंडे, जेसीबीच्या सहाय्याने फुलांचा वर्षाव, भव्य आतषबाजी, साखरपेढ्यांचे वाटत करीत डॉ. आंबेडकरांच्या जयघोषाने हजारो भीमसैनिक या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरले. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिलेला शब्द पाळून जयसिंगपूरात 'ना भूतो ना भविष्यतो' असा आगमन सोहळा झाला.
जयसिंगपूर येथील शिवतीर्थ येथून या आगमन सोहळ्याला सुरुवात झाली. आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, माजी नगराध्यक्ष संजय पाटील- यड्रावकर तसेच नगरपालिकेच्यावतीने मुख्याधिकारी टीना गवळी यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. यावेळी भंते ज्ञानज्योती गुगवाड यांनी पुतळ्याचे पूजन करून बौद्ध वंदना दिली.
शिवतीर्थ येथून मिरवणूक नांदणी रोडवरीलडेबॉन्स कॉर्नरपासून नांदणी नाक्यापर्यंत आली. बौद्ध बांधवांसह भीमसैनिकांनी पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून जल्लोषात स्वागत केले. नांदणी नाका ते बौद्ध विहारापासून क्रांती चौकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा हजारो भीमसैनिकांनी फुलांची उधळण करून अभिवादन केले. अनेक ठिकाणी जेसीबीच्यामाध्यमातून फुलांचा वर्षाव करण्यात आला. मराठा, मुस्लिम, धनगर, वडार, कोळी, मातंग, जैन, लिंगायत, चर्मकार समाज बांधवांनी पेढे, लाडू वाटप करून आनंदोत्सव साजरा केला.
मिरवणुकीत महिला लेझीम पथक, धनगरी ढोल, दाक्षिणात्य ढोल पथक, ऐतिहासिक चित्ररथ, डीजे साऊंड, डान्स ग्रुप, नेत्रदीपकलाईट इफेक्ट्स, फटाक्यांची आतिषबाजी, महिला दांडपट्टा, करबल पथक आणि बाबासाहेबांच्या नावाच्या जयघोषाने संपूर्ण जयसिंगपूर शहरात निळे वादळ निर्माण झाले. या वाद्यांवर तरुणाई सुद्धा थिरकली.
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, बोलो रे बोलो जय भीम बोलो,छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो या जयघोषाने आगमन सोहळा थाटामाटात करण्यात आला. या आगमन सोहळ्यात भीम कन्या दिपाली शिंदे यांचे भाषण, जयसिंगपूर शहरातील सर्व माध्यमिक शाळांनी बाबासाहेबांच्या जीवनकार्याचे चित्ररथाचे, नाट्य शुभांगीच्या कलाकारांनी छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याचा देखावा हा मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण ठरले.
शिवतीर्थ येथून मिरवणुकीला सुरुवात होऊन नांदणी नाका-दिनबंधू सोसायटी- बौद्ध विहार मार्केट क्रांती चौक येथे मिरवणुकीची सांगता झाली. पुतळा पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे सुपूर्त करण्यात आला.
आमदार यड्रावकर यांनी शब्द पाळला
गेल्या विधानसभा निवडणुकीत जयसिंगपूर शहरात डॉ. आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्याचे अभिवचन आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिले होते. हे वचन त्यांनी पूर्ण केल्याने बौद्ध समाजाने आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचा सत्कार केला.
बौद्धांसह बहुजन समाज बांधवांची मोठी गर्दी
५० वर्षापासून जयसिंगपूरातील मध्यवर्ती ठिकाणी डॉ. आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा व्हावा, अशी मागणी होती. आमदार राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याचा आगमन सोहळा केला त्याच धर्तीवर डॉ. आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा मोठ्या थाटामाटात आला या आगमन सोहळ्यात बौद्ध समाजासह बहुजन समाजातील सर्व बांधवांनी उपस्थित राहून एकतेचे दर्शन घडवले.