शहरात डॉ. आंबेडकर जयंती उत्साहात
जिल्हा भाजप कार्यालय
बेळगाव : बेळगाव जिल्हा भाजप कार्यालयात डॉ. बी. आर. आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण करण्यासह आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी खासदार जगदीश शेट्टर, कारवारचे खासदार विश्वेश्वर हेगडे-कागेरी, भाजपा प्रदेश सरचिटणीस पी. राजीव, माजी आमदार संजय पाटील, महांतेश दोड्डगौडा, यल्लेश कोलकार, संदीप देशपांडे, संतोष देशनूर, जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, डॉ. सोनाली सरनोबत, महेश मोहिते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
लोककला-चित्ररथ मिरवणुकीचे आकर्षण
सायंकाळी शहरातील धर्मवीर संभाजी महाराज चौकातून दलित संघटनांच्या चित्ररथ मिरवणुकीला सुरुवात झाली.पालकमंत्री सतीश जारकीहोळी, युवा नेते राहुल जारकीहोळी यांच्या उपस्थितीत मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला. महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, उत्तरचे आमदार राजू सेठ यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. शहर, उपनगर व ग्रामीण भागातून विविध चित्ररथ सहभागी झाले होते. डीजेच्या तालावर भीमप्रेमींनी ताल धरला होता. त्याबरोबरच आकर्षक देखावे सादर करण्यात आले. धर्मवीर संभाजी महाराज चौकातून सुरू झालेली मिरवणूक किर्लोस्कर रोड, रामदेव गल्ली, काकतीवेस, चन्नम्मा चौकमार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात सांगता झाली. मिरवणूक शांततेत पार पडावी, कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्याचबरोबर वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी मिरवणूक मार्गाकडे येणारे सर्व रस्ते बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आले होते.
महाराष्ट्र एकीकरण युवा समिती
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती युवा समिती कार्यालय, टिळकवाडी येथे साजरी करण्यात आली. अध्यक्ष अंकुश केसरकर आणि शेखर तळवार यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष अंकुश केसरकर म्हणाले, की बाबासाहेबांनी लोकशाही बळकट करण्यासाठी चिन्हाकडे न पाहता माणसाकडे पाहून मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, असे सांगितले होते. आजच्या काळात याची आवश्यकता असून जर देशाची प्रतिमा विश्वगुरुप्रमाणे घडवायची असेल तर सर्वांनी बाबासाहेबांच्या या विचारांवर चालायची गरज आहे. सीमालढा आजपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जी लोकशाहीची तत्त्वे आखून दिली आहेत, त्यानुसारच लढला जात आहे. याच लोकशाही मार्गाने सीमावासियांना न्याय नक्की मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. युवा समितीचे पदाधिकारी अश्वजित चौधरी यांनी बाबासाहेबांच्या जीवनप्रवासाचा आढावा घेतला. बाबासाहेबांचे कार्य हे एका विशिष्ट वर्गासाठी नसून सर्व भारतीयांना नवीन दिशा देणारे आणि माणसाला माणूस म्हणून अधिकार मिळवून देणारे होते, असे सांगितले. यावेळी कार्याध्यक्ष सचिन केळवेकर, उपाध्यक्ष वासू सामजी, राजू कदम, किरण हुद्दार, सूरज कुडूचकर, राकेश सावंत, आकाश भेकणे, प्रतीक पाटील, शाम किरमटे आदी उपस्थित होते. सरचिटणीस श्रीकांत कदम यांनी आभार मानले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांकडून एकात्मतेचा संदेश : भीमपुत्र बी. संतोष यांचे प्रतिपादन : 134 वी जयंती उत्साहात
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत प्रस्थापितांबरोबर लढा देत उपेक्षितांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. अनेक अडचणींना सामोरे जाऊन समाजाला एकात्मतेचा संदेश दिला. त्यांनी 50 हजारहून अधिक पुस्तकांचे वाचन केले. युवा पिढीने डॉ. बाबासाहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत वाचन केले पाहिजे, असे मत भीमपुत्र बी. संतोष यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आंबेडकर उद्यानात सोमवारी भीमपुत्र बी. संतोष यांचे व्याख्यान आयोजित केले होते. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा प्रशासन, जि. पं., मनपा आणि समाज कल्याण खात्याच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि. 14 रोजी डॉ. बाबासाहेबांची 134 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. समाजातील उपेक्षितांना न्याय मिळावा यासाठी डॉ. बाबासाहेबांनी अनेक अडचणींना सामोरे जात संघर्ष केला. त्यांच्या संविधानानुसार देशाची वाटचाल सुरू आहे. समाजाला त्यांनी एकात्मतेचा संदेश दिला असून 50 हजारहून अधिक पुस्तकांचे वाचन केले आहे. त्यामुळे आजच्या पिढीने डॉल्बीवर भर न देता किमान तीन-चार पुस्तके दररोज वाचावीत, असे भीमपुत्र बी. संतोष म्हणाले.
डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त आंबेडकर उद्यानातील पुतळ्याचे पूजन करण्यात आले. यावेळी दलित नेते व समाज बांधवांकडून जयघोष करण्यात आला. यावेळी महिला व बाल कल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, प्रादेशिक आयुक्त संजय शेट्टण्णावर, उत्तर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक डॉ. चेतनसिंह राठोड, पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग, जि. पं. सीईओ राहुल शिंदे आदी उपस्थित होते. डॉ. आंबेडकर उद्यानात सकाळपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. डॉ. आंबेडकरांच्या जीवनावर आधारित पुस्तकांचे प्रदर्शन आणि विक्री करण्यात आली. मान्यवरांनी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने जिल्हा प्रशासनातर्फे डॉ. आंबेडकर उद्यानात विशेष सजावट केली होती. शहरात ठिकठिकाणी आकर्षक कमानी उभारल्या आहेत.डॉ. आंबेडकर भवन येथे महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी, जिल्हाधिकारी, जि. पं. सीईओ, मनपा अधिकारी, समाज कल्याण खात्याच्या अधिकाऱ्यांनी डॉ. बाबासाहेबांच्या मूर्तीला अभिवादन केले. जयंतीला चालना दिल्यानंतर डॉ. आंबेडकर उद्यानात कारवारचे खासदार विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांनीही पुष्पहार अर्पण केला.
गुरुवर्य वि.गो.साठे प्रबोधिनी
गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी प्रगतिशील लेखक संघ व शब्दगंध कवि मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. व्यासपीठावर जयंत नार्वेकर, सुभाष ओऊळकर, प्रा. अशोक अलगोंडी आदी उपस्थित होते. या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर करण्यात आला. यावेळी सुभाष ओऊळकर म्हणाले, डॉ. आंबेडकर यांनी सामाजिक न्याय प्रत्यक्षात देशात राबविताना जातीविरहीत समाजासाठी संविधान निर्माण केले. घटनेत हा विचार समाविष्ट करून समाजाची व देशाची प्रगती साधली. यानंतर विद्यार्थी, पालक व नवोदित कवि यांनी डॉ. आंबेडकर यांच्या कार्यावर कविता सादर केल्या. यामध्ये परम पाटील, स्नेहा हिरोजी, कमल पाटील, गजानन सावंत, बसवंत शहापूरकर, सुधाकर गावडे, मधू पाटील, चंद्रशेखर गायकवाड यांचा सहभाग होता. सूत्रसंचालन बी. बी. शिंदे व प्रसाद सावंत यांनी केले. शिवराज चव्हाण यांनी आभार मानले.