खानापुरात शासकीय-विविध संघटनांतर्फे डॉ. आंबेडकर जयंती साजरी
खानापूर : बाबासाहेबानी शंभर वर्षापूर्वी निपाणी येथे सुशिक्षित व्हा, संघटित व्हा आणि संघर्ष करा, ही घोषणा दिली होती. आज शंभरवर्षे पूर्ण झाल्यानिमित्त निपाणी येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बहुजन आणि दलित समाजातील सर्वांनी या घोषणेच्या आधारे संघटित होऊन उभे राहिले पाहिजे, बाबासाहेबांनी देशाला संविधानाद्वारे संमता, बंधुत्व आणि स्वातंत्र्याची खरी ओळख करून दिली आहे. त्यामुळे भारताने आज जागतिक स्तरावर आपला नावलौकीक मिळविलेला आहे. असे उद्गार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. व्यासपीठावर नगराध्यक्षा मिनाक्षी बैलूरकर, नगरसेवक आप्पय्या कोडोळी, तहसीलदार दुंडाप्पा कोमार, व्ही. आर. नागनूर तसेच डॉ. हुब्बय्या, वासुदेव चौगुलेसह नगरसेवक, दलित संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. खानापूर तालुक्यात तसेच शहरात शासकीय व विविध संघटनांतर्फे डॉ. आंबेडकर यांची 134 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
तालुका पंचायत, नगरपंचायत समाज कल्याण खाते, महसूल खाते, वन खाते यासह सर्व शासकीय खात्यांच्या कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन जुन्या तहसीलदार कार्यालयाच्या आवारात चित्ररथाचे पूजन आमदार विठ्ठल हलगेकर आणि तहसीलदार दुंडाप्पा कोमार यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर शहरातील विविध मार्गावरुन मिरवणूक काढली. मिरवणूक आंबेडकर उद्यानात आल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे तहसीलदार दुंडाप्पा कोमार, आमदार विठ्ठल हलगेकर, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संतोष कुरबेट यांच्या हस्ते पूजन करून अभिवादन करण्यात आले. तसेच दलित महामंडळ, भीमसेना, रोहीदास चर्मकार संघटना तसेच विविध दलित संघटनांतफ अभिवादन केले. यावेळी दलित संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्तें सहभागी झाले होते. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चित्ररथाची मिरवणूक शहरातून काढली. यावेळी झांजपथक, वाद्ये, कलापथके यांचा समावेश होता. मिरवणूक बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आल्यावर सभेत रुपांतर करण्यात आले. यानंतर या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत सभा पार पडली. दलित समाजातील उत्तम गुणवत्तेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव केला.